नागपूर : उन्हाळी परीक्षा ऑफलाईन एमसीक्यू पॅटर्नद्वारे घेणे राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठासाठी मनस्तापाचे कारण ठरले आहे. परीक्षेवरून विद्यापीठाचे नियंत्रण सुटल्याचे चित्र दिसून येत आहे. हाेम सेंटरवर काॅपीचा प्रकार माेठ्या प्रमाणात हाेत आहे. प्रश्नपत्रिका लीक हाेत असून, विद्यार्थी पेपर साेडविण्यासाठी स्मार्ट वाॅच, माेबाईल आणि इतर इलेक्ट्रानिक्स गॅझेटचा वापर करत आहेत.
गुरुवारी याच कारणाने बी. एस्सी.च्या चाैथ्या सेमिस्टरचा गणिताचा पहिला पेपर परीक्षा विभागाला रद्द करावा लागला. आता हा पेपर ६ जुलै राेजी हाेणार आहे. विद्यापीठाच्या परीक्षा विभागानुसार परीक्षेदरम्यान गैरप्रकार झाल्याने हा पेपर रद्द करावा लागला. मात्र, विद्यापीठाने काेणत्या सेंटरवर आणि काय गैरप्रकार झाला, हे स्पष्ट केले नाही. सूत्रांच्या माहितीनुसार परीक्षेआधीच प्रश्नपत्रिका फुटली हाेती. केंद्रावर विद्यार्थी बिनधास्त काॅपी करत हाेते. याबाबतची माहिती परीक्षा विभागाला मिळाल्यानंतर पेपर रद्द केला.
विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षेच्या पहिल्या दिवशीपासून गैरप्रकार आणि गाेंधळाची स्थिती सुरू झाली. विद्यार्थी बिनधास्त माेबाईल, स्मार्टवाॅच, इलेक्ट्रानिक्स गॅझेटचा वापर करत आहेत. शिक्षकच विद्यार्थ्यांना पेपर साेडविण्यासाठी मदत करत आहेत. उल्लेखनीय म्हणजे विद्यापीठाने महाविद्यालयाच्या प्राचार्यांना परीक्षेसाठी केंद्रप्रमुख नियुक्त केले. साेबतच त्यांना गाेपनीय आयडी आणि पासवर्डही देऊन टाकले. याच आयडीवर महाविद्यालयांना प्रश्नपत्रिका आणि उत्तर चावी पाठवली जात आहे. केंद्रप्रमुखही बेजबाबदारपणा करत आयडी आणि पासवर्ड कर्मचाऱ्यांना देत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार प्रश्नपत्रिका आणि उत्तर चावी डाऊनलाेड करून विकली जात आहे. हा गैरप्रकार राेखण्यात विद्यापीठाचा परीक्षा विभाग अपयशी ठरत आहे.
गैरप्रकार झाल्याचे विद्यापीठाला मान्य
विद्यापीठाने गुरुवारी परिपत्र जारी केले. यावरून परीक्षेमध्ये गैरप्रकार हाेत असल्याचे एकप्रकारे विद्यापीठाने मान्यच केले आहे. मात्र, काेणतेही काॅलेज किंवा व्यक्तीवर कारवाई झाली नाही, हेही विशेष.
‘लाेकमत’चा मागोवा
१७ जून : गुरुजींनी बुडवली ७० विद्यार्थ्यांची नाव
१९ जून : उत्तरपत्रिका काेरी साेडावी, मागे वळून पाहू नका
२३ जून : बीई आठव्या सेमिस्टरची प्रश्नपत्रिका फुटली
उघडकीस आणले प्रकार
विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षेमध्ये गैरप्रकार हाेत असल्याचे अनेक खुलासे ‘लाेकमत’ने सातत्याने प्रकाशित केले आहेत. मात्र, विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. सुभाष चाैधरी याकडे दुर्लक्ष करत आहेत. परीक्षा अधिक पारदर्शक आणि नियमानुसार हाेण्यासाठी त्यांच्याकडून आतापर्यंत पुढाकार घेतला गेला नाही. परीक्षेमध्ये सुरू असलेला गाेरखधंदा राेखण्यासाठी त्यांनी कठाेर पावले उचलली नाहीत.