लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरातील प्रतिभावान बॅडमिंटनपटू मालविका बनसोडने रविवारी कौनास (लिथुआनिया) येथे आयर्लंडची राचेल डेराग हिच्यावर सरळ गेम्समध्ये मात करीत आरएसएल लिथुआनियाई आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद पटकाविले.
तिसरी मानांकित १९ वर्षांच्या मालविकाने २९ मिनिटात चौथी मानांकित डेरागवर २१-१४, २१-११ ने विजय नोंदविला. गेल्या महिन्यात ऑस्ट्रिया ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारणाऱ्या मालविकाने उपांत्य सामन्यात फ्रान्सची ऐन्ना टात्रानोवा हिचा २१-१३,२१-१० ने पराभव केला.
येथे सुरुवातीच्या सामन्यात मालविकाने स्थानिक खेळाडू विल्टे पालौस्केटेचा पहिला फेरीत २१-६, २१-१० ने पराभव केला होता. त्यानंतर तिने इस्रायलच्या हेली निमानविरुद्ध २१-१०, २१-११ ने सरशी साधली. उपांत्यपूर्व फेरीत तिने ऑस्ट्रियाच्या कॅट्रिन नूडोल्टचा २१-१२, २१-९ ने पराभव केला होता.