लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नीती आयोगाच्या बैठकीत नकार देणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर माजी केंद्रीय मंत्री व भाजप नेते मुकुल रॉय यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे. ममता बॅनर्जी यांचा लोकशाहीवर विश्वासच नाही व त्यांचे वर्तन हे उद्दामपणाचे आहे, असे रॉय म्हणाले.शुक्रवारी मुकुल रॉय खासगी कामाने नागपूरला आले होते. नवी दिल्लीला परत जात असताना त्यांनी ‘लोकमत’जवळ आपली भावना मांडली. ममता बॅनर्जी यांची वर्तणूक ही एखाद्या हुकूमशहासारखी होत आहे. अगोदर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ््यात येण्यास नकार दिला. आता नीती आयोगाच्या बैठकीला येण्यासदेखील त्यांनी नकार कळविला आहे. देशाच्या व्यवस्थेत एका मुख्यमंत्र्याचे असे वागणे योग्य नाही. ममतांचा लोकशाहीवर विश्वास नसल्याचे यातून स्पष्ट होत असल्याचे ते म्हणाले.ममता बॅनर्जी यांचे पश्चिम बंगालमधील हिंसेला समर्थन आहे. डाव्यांनी बंगालमध्ये हिंसेचे वातावरण तयार केले आणि ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात तृणमूल कॉंग्रेसने त्याला वाढविले आहे. ममतांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. यातूनच त्यांच्या समर्थकांनी हिंसेचा आधार घेतला आहे. मात्र अराजकतेचे हे सरकार जास्त दिवस टिकणार नाही. सत्ताधारी आमदारांमध्येदेखील नाराजी आहे. लवकरच पश्चिम बंगालचे सरकार पडेल, असा दावा रॉय यांनी केला.ममता बॅनर्जी यांनी प्रशांत किशोर यांची भेट घेतल्यासंदर्भात विचारणा केली असता, प्रशांत किशोर हे काही ‘बाजीगर’ नाहीत, असा चिमटा रॉय यांनी काढला. बिहार, उत्तर प्रदेशमध्ये प्रशांत किशोर यांचे गणित चालले नाही. आता ममता बॅनर्जी यांनी हताशेतूनच किशोर यांची मदत घेण्याचे पाऊल उचलले आहे, असे मुकुल रॉय म्हणाले.
ममता बॅनर्जींचा लोकशाहीवर विश्वासच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2019 10:35 AM
नीती आयोगाच्या बैठकीत नकार देणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर माजी केंद्रीय मंत्री व भाजप नेते मुकुल रॉय यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
ठळक मुद्देमुकुल रॉय यांचे टीकास्त्र पश्चिम बंगालचे सरकार पडणार