लोकमत न्यूज नेटवर्क
नंदीग्राम : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान गुरुवारी होणार आहे. या टप्प्यात उभे असलेल्या १७१ उमेदवारांपैकी २५ टक्के उमेदवारांविरोधात गुन्हेगारी खटले सुरू आहेत. मागील काही दिवसांतील हिंसाचाराच्या घटना लक्षात घेता संपूर्ण भागात कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. विशेषत: मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नंदीग्राममधून निवडणूक लढत असून, त्यांच्यासमोर भाजपचे शुभेंदु अधिकारी यांचे मोठे आव्हान आहे.
दुसऱ्या टप्प्यात पूर्व मेदिनीपूर, पश्चिम मेदिनीपूर, बांकुरा व दक्षिण २४ परगणा या जिल्ह्यांमधील ३१ जागांवर निवडणूक होणार आहे. एकूण उमेदवारांपैकी केवळ ११ टक्के उमेदवार महिला आहेत. या टप्प्यात तृणमूल काँग्रेस व भाजपमध्येच प्रमुख लढत असल्याचे मानले जात आहे. दोन्ही पक्षांतील दिग्गज नेत्यांनी प्रचारासाठी कंबर कसली होती.
हिंसाचार टाळण्याचे आव्हान
नंदीग्राम व आजूबाजूच्या भागात निवडणूक हिंसाचाराचा इतिहास राहिला आहे. प्रचारादरम्यानदेखील येथे हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे येथे हिंसाचार टाळण्याचे मोठे आव्हान सुरक्षायंत्रणेसमोर राहणार आहे. सीएपीएफच्या ६९७ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
असा आहे दुसरा टप्पा
एकूण जागा - ३०
मतदार - ७५,९४,५४९
एकूण मतदान केंद्रे - १०,६२०
उमेदवार - १७१
गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार
- १७१ पैकी ४३ (२५ टक्के) उमेदवारांविरोधात फौजदारी खटले सुरू (भाजप - ५७ टक्के, तृणमूल - २७ टक्के, भाकपा - ५० टक्के, माकपा - ४७ टक्के, बसपा - २७ टक्के, काँग्रेस - २२ टक्के)
- ३५ (२१ टक्के) उमेदवारांविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे (भाजप - ५३ टक्के, तृणमूल - १७ टक्के, माकपा - ४० टक्के, बसपा - २९ टक्के, काँग्रेस - २२ टक्के)
अशी आहे उमेदवारांची संपत्ती
- २६ (१५ टक्के) उमेदवार कोट्यधीश (भाजप - ३३ टक्के, तृणमूल - ३७ टक्के, काँग्रेस - २२ टक्के)
उमेदवारांचे शिक्षण
शिक्षण - उमेदवारांची टक्केवारी
दहावीपर्यंत - ३७ टक्के
पदवी व पदव्युत्तर - ५९ टक्के
पदविका - २ टक्के