लोकमत न्यूज नेटवर्क
कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान नवमतदार व तरुण मतदारांपर्यंत पोहोचण्यावर पक्षांचा भर दिसून येत आहे. तरुणांना आकर्षित करण्यासाठी तृणमूल काँग्रेसने चक्क अॅनिमेशन व्हिडीओची मदत घेतली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना व्हिडीओ गेममधील मारियोप्रमाणे दाखविण्यात आले आहे.
तृणमूलने ट्विटरच्या माध्यमातून हा व्हिडीओ मतदारांपर्यंत पोहोचविला आहे. व्हिडीओत ममता बॅनर्जी या मारियोप्रमाणे गेमचे विविध टप्पे पार करताना दिसून येतात. सुरुवातीला बांग्ला निजेर मेये केई चाय दिखाया अशी टॅगलाईन येते. त्यानंतर बंगालमध्ये परिवर्तन आणणाऱ्या मारियोच्या भूमिकेत ममता बॅनर्जी दाखविण्यात आले आहे.
खेला होबेचादेखील समावेश
या व्हिडीओमध्ये एक एक टप्पा पार करत असताना तृणमूलच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. सोबतच ममतांचा या निवडणुकीसाठी असलेला खेला होबे हा नारादेखील यात समाविष्ट करण्यात आला आहे. अखेरच्या टप्प्यात तृणमूलच्या जाहीरनाम्यातील १० बाबी समोर येतात.