नागपूर : अनेक वर्षांपासून बिझनेस पार्टनर असलेल्या व्यक्तीलाच ३० लाखांनी फसविणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. संबंधित आरोपीने खोट्या सह्या करून नातेवाइकांना ३० लाख रुपये वळते केले होते. शिवाय मूळ करारनाम्यातदेखील खोट्या सह्यांच्या मदतीने फेरफार करून भागीदारीचा हिस्सा कमी केला. मनोज मोरेश्वर उराडे ( ४२, नगरविकास सोसायटी, सोमलवाडा) असे आरोपीचे नाव आहे.
आनंदकुमार सागरमल नहार (४३, सोमलवाडा) यांनी मनोजसोबत २००७ मध्ये ड्रीमलँड रिअल इस्टेट डेव्हलपर या फर्मची स्थापना केली. दोघांचीही भागीदारी ५०-५० टक्के होती. चंद्रपूरसोबत त्यांनी नागपुरातदेखील कार्यालय सुरू केले. त्यांचे संयुक्त खाते होते व पैसे काढण्यासाठी दोघांच्याही स्वाक्षऱ्या आवश्यक होत्या. काम अडू नये यासाठी मनोजने नहार यांच्या कोऱ्या धनादेशांवर स्वाक्षऱ्या घेऊन ठेवल्या होत्या. मात्र त्याने ते धनादेश कार्यालयाच्या कामासाठी न वापरता स्वत:कडेच ठेवले.
मे २०२२ मध्ये मनोजने नहार यांना माहिती न देता खात्यातील रक्कम दुसरीकडे वळती केली. यासाठी त्याने खोट्या स्वाक्षऱ्यादेखील केल्या. नहार यांना ही बाब कळताच त्यांनी बँकेशी संपर्क साधून व्यवहार थांबविला. परंतु ऑगस्टमध्ये मनोजने स्वत:च्या नातेवाइकांच्या खात्यावर ३० लाख रुपये वळते केले. याशिवाय त्याने पार्टनरशिप करारामध्ये बदल करून खोट्या स्वाक्षरीच्या मदतीने नहार यांचा हिस्सा १४ टक्के केला. नहार यांनी यासंदर्भात सोनेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्राथमिक चौकशी करून मनोजविरोधात गुन्हा नोंदविला व त्याला अटक केली.