नागपूर : लोहमार्ग पोलिसांनी महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये पकडलेल्या २.२१ लाख रुपयांच्या ब्राउन शुगरच्या तस्करीच्या प्रकरणात आणखी एक यश मिळविले आहे. लोहमार्ग पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या चमूने तस्करी आणि नशेच्या व्यवसायात सहभागी महिलेसह आणखी एका आरोपीला अटक केली आहे.
ब्राउन शुगर तस्करी प्रकरणात आतापर्यंत या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली आहे. तर, दोन आरोपी फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. अटक केलेल्या आरोपीत ज्योती जय करियार (४०), रा. दहाखोली, गोंदिया आणि प्रकाश महादेव कोदर्लीकर (४५) रा. देवीकर मोहल्ला, जुनी मंगळवारी यांचा समावेश आहे. या प्रकरणात लोहमार्ग पोलिसांनी कठोर परिश्रम घेऊन गोंदियावरून अरशदला अटक केली होती. तपासात अरशदने तस्करीची पद्धत आणि इतर बाबींचा खुलासा केला. ज्योतीच पैसे देऊन आपणास नागपूरवरून ब्राउन शुगर आणण्यासाठी पाठवित होती, असे त्याने सांगितले. नागपुरात प्रकाश त्याला ब्राउन शुगर पुरवित होता. अरशद ब्राउन शुगर घेऊन महाराष्ट्र एक्स्प्रेसने गोंदियाला परत जाऊन खरेदी केलेला माल ज्योतीला देत होता. नशेच्या या व्यवसायात ज्योतीच मुख्य सूत्रधार असल्याचे सांगण्यात येत आहे. लोहमार्ग पोलिसांना आणखी दोन आरोपींचा शोध आहे. मिळालेल्या माहितीनुसार ज्योती आणि अरशद दीर्घ कालावधीपासून ब्राउन शुगरची तस्करी आणि विक्री करीत होते. परंतु, लॉकडाऊनमुळे बसेस आणि रेल्वेगाड्या नसल्यामुळे त्यांनी हे काम बंद केले होते. मात्र, रेल्वेगाड्या सुरू होताच ज्योतीने पुन्हा अरशदला नागपूरवरून ब्राउन शुगर आणण्यास पाठविले. पकडल्या जाण्यापूर्वी अरशदने अनेकदा ब्राउन शुगरची तस्करी केली आहे. ही कारवाई लोहमार्ग पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सतीश जगदाळे, सहायक पोलीस निरीक्षक ओमप्रकाश भलावी, विवेक चहांदे, संजय पटले, पुष्पराज मिश्रा, रोशन मोगरे, प्रवीण खवसे, मुकेश नरुले यांनी पार पाडली.
...............