लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जुने प्रेमसंबंध ठेवू न दिल्याच्या कारणावरून एका तरुणाने सून आणि तिच्या सासूवर जीवघेणा हल्ला केला. त्यात दोन्ही महिला जखमी झाल्या असून, घटनेनंतर लगेच आरोपी तरुणाने नजीकच्याच विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. उमरेड तालुक्यातील मकरधोकडा येथे मंगळवारी (दि.७) मध्यरात्री घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
योगेश नितीन आंबुलकर (२५, रा. मकरधोकडा, ता. उमरेड) असे आत्महत्या करणाऱ्या आरोपी तरुणाचे नाव आहे. इंदिराबाई सुखदेव बेलखुडे (६०) व रोशनी महेंद्र बेलखुडे (२७) असे जखमी महिलांची नावे आहेत. यापैकी रोशनी हिची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. दाेघींवरही नागपुरात उपचार सुरू आहे.
मंगळवारी सासू इंदिराबाई, सून रोशनी व आपल्या नातवंडासह घरी झोपून होत्या. रोशनीचा पती महेंद्र हा वेकोलि येथे सुरक्षा कर्मचारी असून, तो नाईट ड्युटीवर होता. दरम्यान मध्यरात्री १२.१५ वाजताच्या सुमारास इंदिराबाई लघुशंकेसाठी उठल्या. यावेळी त्यांना आरोपी योगेश आंबुलकर हा घरातील एका कोपऱ्यात बसलेला आढळून आला. सोबत त्याच्या हातात लोखंडी घण दिसला. इंदिराबाईंनी तू आत कसा आला, अशी विचारणा केली. घराच्या खिडकीतून आत आलो, असे त्याने उत्तर दिले.
खिडकीचा एक पल्ला उघडाच होता. अशातच इंदिराबाईने आरोपी योगेश यास हटकले. तुझे इतक्या रात्री अशाप्रकारे येणे योग्य नाही, असे म्हणताच त्याने दोन्ही हाताने लोखंडी घण उचलून डोक्यावर उजव्या बाजूस मारून जखमी करीत तिला दरवाजावर ढकलले. दरम्यान, आवाज आल्याने रोशनीला जाग आली तिने बाहेर येऊन पाहताच आरोपीने रोशनीवरही हल्ला करत छातीवर व डोक्यावर घणाने प्रहार करून तिला गंभीर जखमी केले.
इंदिराबाई आरडाओरड करीत घराबाहेर निघाली. नागरिकांची गर्दी जमली. त्यानंतर योगेशने विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. याप्रकरणी उमरेड पाेलिसांनी फिर्यादी इंदिराबाई बेलखुडे यांच्या तक्रारीवरून विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक राजीव लोले करीत आहेत.
बुधवारी मृतदेह बाहेर काढला
आरोपी योगेश आंबुलकर याने दोन्ही महिलांना जखमी केल्यानंतर दोघींनीही आरडाओरड सुरू केली. लागलीच आरोपी योगेशने घटनास्थळावरून पळ काढला. अवतीभवती गर्दी जमली. अशातच याेगेशने नजीकच्याच विहिरीत उडी मारली. त्याला नागरिकांनी वाचविण्याचाही प्रयत्न केला. परंतु त्याने कोणताही प्रतिसाद दिला नाही. अखेर बुधवारी सकाळच्या सुमारास गावातील नागरिकांनी त्याचा मृतदेह विहिरीबाहेर काढला.