नागपूर : नायलॉन मांजाच्या धोक्याबाबत वारंवार सूचना देऊनही याचा वापर थांबत नसल्याचे चित्र आहे. सदर उड्डाणपुलावर अशाच मांजामुळे एका प्राध्यापकाचा जीव धोक्यात आला होता. त्यांच्या दुचाकीचा वेग जास्त असता तर अघटित घटना घडली असती. प्रशासनाकडून नायलॉन मांजाविक्रेते व शौकिनांवर कायमस्वरुपी वचक बसेल अशी कारवाई एखाद्याचा जीव गेल्यावन केली जाणार आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.
सदर उड्डाण पुलावर रविवारी दुपारच्या सुमारास एक प्राध्यापक आपल्या दुचाकीने जात असताना गळ्याला काप बसत असल्याचे त्यांच्या लक्षात आले, यावेळी हाताने मांजा दूर करण्याच्या प्रयत्नात त्यांच्या दोन बोटांना काप बसला. हा प्रकार वेळीच त्यांच्या लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला.
म्हाळगीनगर येथील रहिवासी प्रा. राजेश क्षीरसागर रविवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास ते दुचाकीने मित्रासोबत सदर उड्डाणपुलावरून जात असताना अचानक मांजा आडवा आला. त्यांनी अंगावर घातलेले जॅकेट कापत मांजा गळ्यापर्यंत पोहोचला. गळ्याला काप बसत असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी हाताने मांजा दूर करण्याचा प्रयत्न केला; पण त्यात त्यांच्या बोटाला चांगलाच काप बसला. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मांजामुळे दरवर्षी जीवघेण्या घटना घडत आहेत. पोलीस प्रशासन व महापालिकेने नायलॉन मांजाच्या विरोधात मोहीम सुरू केली आहे. काही भागात मांजाच्या चकऱ्या जप्त करण्यात आल्या आहे; पण अजूनही मांजाची विक्री सुरूच आहे. गेल्या काही दिवसांपासून नागपुरात पतंगबाजीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता मांजामुळे जीवघेण्या घटना पुढच्या काही दिवस घडणारच आहेत. त्यासाठी प्रशासनाने ही मोहीम अजून तीव्र करण्याची गरज आहे.
मांजामुळे जखमी झालेले क्षीरसागर हे या घटनेमुळे प्रचंड घाबरले आहेत. थोडेजरी दुर्लक्ष झाले असते तर अनर्थ झाला असता. पोलीस प्रशासनाने या मांजा विक्रेत्यांवर व पतंग शौकीनांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.