लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एकीकडे भाचीचा लग्नसोहळा सुरू असताना दुसरीकडे मामाने गळफास लावून आत्महत्या केली. मनोहर महादेवराव बांते (वय ५३, रा. हावरापेठ, भगवाननगर) असे मृताचे नाव असून ते रामेश्वरीतील बांते सुपर बाजारचे संचालक तर नगरसेविका विशाखा शरद बांते यांचे दीर होते. गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
बांते यांचे संयुक्त कुटुंब हावरापेठ येथे राहते. त्यांच्या भाचीचे लग्न गुरुवारी सकाळी खरबी येथे आयोजित करण्यात आले होते. त्यामुळे बांते कुटुंबातील मंडळी लग्नाला खरबी येथे गेली होती. मनोहर यांचे बंधू माजी नगरसेवक शरद बांते यांचा मुलगा सुपर बाजारमध्ये गेला होता. तर मनोहर बांते यांनी ११ वाजेपर्यंत लग्नस्थळी पोहोचणार, असे सांगितले होते; मात्र ११ वाजूनही ते लग्नस्थळी न पोहोचल्याने शरद बांते यांनी त्यांना फोन केला. वारंवार फोन करुनही प्रतिसाद मिळत नसल्याने बांते यांनी सुपर बाजारमधील एका कर्मचाऱ्याला घरी जाऊन बघण्यास सांगितले असता आतून दार बंद असल्याचे कळले. शरद बांते यांना शंका आली आणि त्यांनी लगेच कुटुंबासह घर गाठले. दार तोडून बघितले असता आत मनोहर बांते गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आले. त्यांना लगेच मेडिकलला नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
लग्न समारंभात शोककळा
या घटनेची माहिती मिळताच बांते यांच्या भाचीच्या लग्न समारंभात शोककळा पसरली. नातेवाईकांनी बांते यांचे घर गाठले. अजनी पोलीसही पोहोचले. प्राथमिक चाैकशीनंतर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. मनोहर बांते यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती चांगली होती; मात्र त्यांना नैराश्येने घेरले होते. त्यांच्यावर डॉ. भावे यांच्याकडे उपचारही सुरू होते, असे शरद बांते यांनी सांगितले.
महिनाभरानंतर होणार होते मुलीचे साक्षगंध
मनोहर यांच्या परिवारात पत्नी रसिका, मुलगी तनुश्री, मुलगा अथर्व आहे. अथर्व हा पुण्याला अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. त्यांच्या मुलीचे नुकतेच लग्न जुळले होते. २० मार्चला साक्षगंध होणार होता. तर मे महिन्यात लग्न काढण्याचे ठरले होते. पण, त्यापूर्वीच ही दुर्दैवी घटना घडली.