नागपूर : नागपुरात हत्यांचे सत्र सुरूच असून, रविवारी एका पतीने आपल्या पत्नीची चारित्र्याच्या संशयावरून हत्या केली आणि त्यानंतर गळफास घेत स्वतःही आत्महत्या केली. सदर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मॉइल वसाहतीत ही थरारक घटना घडली असून, पत्नी मॉइलमध्ये कार्यरत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे दोघांचाही प्रेमविवाह झाला होता व कर्करोगाने ग्रस्त असलेल्या पतीच्या उपचारासाठीच पत्नी जीवाचे रान करत होती. या प्रकारामुळे मॉइल वसाहतीत खळबळ उडाली होती.
सोनिया मंडाले (३७) असे मृत पत्नीचे नाव असून, राजेश (४५) हा आरोपी पती आहे. सोनिया मॉइलमध्ये कार्यरत होती तर राजेश गेल्या चार वर्षांपासून कर्करोगाने ग्रस्त होता. त्याच्यावर उपचार सुरू होते. ते तीन महिन्यांअगोदर छावणी येथील मॉइल कर्मचारी वसाहतीत राहायला आले होते. ए-३ क्रमांकाच्या इमारतीतील चौथ्या माळ्यावरील त्यांच्या क्वॉर्टरमध्ये रविवारी सकाळी त्यांच्यात चारित्र्याच्या संशयावरून वाद झाला आणि राजेशने सोनियाच्या डोक्यात हातोड्याने प्रहार करून तिची हत्या केली. त्यानंतर त्याने सिलिंग फॅनला गळफास घेत आत्महत्या केली. त्यांची १४ वर्षीय मुलगी त्यावेळी घरातच दुसऱ्या खोलीत झोपली होती. सकाळी दहाच्या सुमारास ती उठली असता, तिला हा प्रकार दिसला. यावेळी हादरलेल्या मुलीने तातडीने नातेवाईक व शेजारच्यांना या प्रकाराची माहिती दिली. सदर पोलिस ठाण्याचे पथकदेखील घटनास्थळावर पोहोचले. पती-पत्नीचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. अमित यादव यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.
पहिल्या पत्नीला सोडून केले होते लग्न
सोनिया ही मॉइल येथील प्रयोगशाळेत कार्यरत होती. पतीच्या उपचारासाठीच तिने नागपुरात बदली घेतली होती. मूळचा शीतलवाजी येथील राजेश हा फार अगोदर खाणीतच कामाला होता. मात्र, त्यानंतर त्याला हृद्याचा त्रास झाल्याने त्याने काम सोडले. चार वर्षांअगोदर त्याला तोंडाचा कर्करोग झाला. त्याच्यावर केमोथेरपी सुरू होती. मात्र, त्याच्या प्रकृतीत फारशी सुधारणा झाली नव्हती. त्यामुळे तो घरीच असायचा. त्याचे अगोदर एक लग्न झाले होते. मात्र, त्याचे सोनियावर प्रेम जडले व पहिल्या पत्नीला सोडून त्याने सोनियाशी लग्न केले होते. मागील चार वर्षांपासून घरीच असल्याने तो सातत्याने तिच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. यातून त्यांच्यात अधेमधे वादावादीदेखील होत होती, अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.
मुलगी ‘शॉक’मध्ये, आता तिचे काय होणार ?
सोनियाचा नववीत गेलेल्या मुलीवर फार जीव होता. तिला एका नामांकित शाळेत प्रवेशदेखील मिळाला होता व दोन दिवसांअगोदरच शाळा सुरू झाली होती. रात्री आईशी गप्पा मारून ती झोपली व सकाळी १० वाजण्याच्या सुमारास वीज गेल्यामुळे ती झोपेतून उठली. खोलीतून बाहेर आल्यावर तिने आयुष्य उद्ध्वस्त करणारे दृश्य पाहिले. या प्रकारामुळे तिला मोठा धक्का बसला आहे. तर आता तिचे काय होणार, ही चिंता तिच्या नातेवाईकांना सतावते आहे.