नागपूर : तीन महिन्यापासून हातात वेतन मिळत नसल्यामुळे टेंशनमध्ये विषारी औषध प्राशन करून एका व्यक्तीने आपला जीव गमावल्याची घटना नविन कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी १९ मे रोजी दुपारी ३.२० ते ४ वाजे दरम्यान घडली. अतुल अशोक रणके (वय ४०, रा. सिटी हॉस्पीटलसमोर, कुंभारे ले आऊट, येरखेडा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
अतुल आदिवासी विभागात नोकरीला होते. त्यांनी गृहकर्ज घेतले होते. सोबतच क्रेडीट कार्ड घेतले होते. परंतु मागील तिन महिन्यांपासून त्यांच्या पगाराचे सगळे पैसे कपात होत असल्यामुळे आर्थिक अडचण निर्माण झाल्याने ते तणावात होते. अशातच त्यांनी शुक्रवारी आपल्या घराच्या बाथरुममध्ये कोणतेतरी विषारी औषध प्राशन केले. त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना उपचारासाठी मेडिकलच्या वॉर्ड क्रमांक ५२ मध्ये दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान सोमवारी २२ मे रोजी दुपारी २.३० वाजता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
मिळालेल्या वैद्यकीय सूचनेवरून नविन कामठीच्या महिला पोलिस उपनिरीक्षक मनिषा जाधव यांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरु केला आहे. अतुल यांच्या कुटुंबात पत्नी आणि दोन मुले आहेत. त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.