हिंगणा (नागपूर) : वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी १५ ते २० मित्र हिंगणा तालुक्यातील मोहगाव (झिल्पी) तलाव येथे गेले. पार्टीनंतर तलावात हातपाय धुण्यासाठी गेलेल्या एकाचा बुडून मृत्यू झाला. रविवारी सांयकाळी ६ वाजताच्या सुमारास ही घटना घटली. सोमवारी (दि. ३०) अग्निशमन दलाच्या पथकाने मृतदेह बाहेर काढला. आशिष दिगांबर मराठे (२७, रा. खापरी पुनर्वसन कॉलनी) असे मृताचे नाव आहे. तो मूळचा भंडारा जिल्ह्यातील राहणारा आहे. तो ॲमेझॉन कंपनीत सेक्युरिटी गार्ड म्हणून कामाला होता.
२९ जानेवारी रोजी दुपारी २ वाजताच्या दरम्यान ॲमेझॉन कंपनीतील सुरक्षा गार्ड म्हणून काम करणारे १५ ते २० मित्र प्रदीप बावनकर यांच्या वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी मोहगाव (झिल्पी) तलाव काठावर गेले. वाढदिवसाची पार्टी आटोपल्यानंतर आशिष मराठे हायपाय धुण्यासाठी तलावात उतरला. मात्र, पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नसल्याने तो गटांगळ्या खाऊ लागला. त्याच्या मदतीसाठी अतुल खडसे व दोन मित्रही धावले. मात्र, आशिष हा पाण्यात खोलवर गेल्याने घाबरून मदतीसाठी गेलेले मित्र तलावाबाहेर आले. मात्र, पाण्यात बुडालेला आशिष बाहेर आला नाही.
घटनेची माहिती हिंगणा पोलिसांना मोहगावचे सरपंच प्रमोद डाखले यांनी दिली. यानंतर सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय वाघ यांनी अग्निशमन दलाच्या पथकाला पाचारण केले. या पथकातील कर्मचारी दिनकर गायधने व शरद दांडेकर यांनी तलावात शोध मोहीम राबविली. मात्र, रात्र झाल्याने ही शोध मोहीम थांबविण्यात आली. सोमवारी सकाळी ६ वाजता पुन्हा अग्निशमन दलाने शोध मोहीम सुरू केली असता, सकाळी ९ वाजताच्या दरम्यान आशिषचा मृतदेह पथकाच्या हाती लागला.
हिंगणा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हिंगणा ग्रामीण रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी हिंगणा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. घटनेचा तपास ठाणेदार विशाल काळे, सहायक पोलिस निरीक्षक गजानन तेलरांधे, पोलिस कर्मचारी हरीश बगडे करीत आहेत.