नागपूर : घरातील जुने फर्निचर विकण्यासाठी ऑनलाईन जाहिरात करणे एका तरुणाला चांगलेच भोवले. अज्ञात सायबर गुन्हेगारांनी त्याला १.८४ लाखांनी गंडा घातला. राणाप्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
राहुल लक्ष्मण सहारे (२६, भामटी, प्रतापनगर) हा तरुण पुण्यातील एका कंपनीत नोकरी करतो व त्याचे नागपुरात घरी येणेजाणे असते. त्याला घरातील जुने फर्निचर विकायचे होते. त्यामुळे फर्निचर विकण्यासाठी ओएलएक्स या ॲपवर जाहिरात केली व फोटोदेखील टाकले. त्याच्या आईच्या मोबाईलवरून ही जाहिरात टाकण्यात आली होती. काही वेळातच सुभाषनगरातून फर्निचरच्या दुकानातून बोलत असल्याचा एका व्यक्तीचा आईच्या मोबाईलवर फोन आला व १४ हजारांत फर्निचर विकत घेण्याची तयारी दाखविली.
राहुलने पैसे ट्रान्सफर करण्याबाबत त्याच्याशी बोलणे केले व बॅंक खात्याचे तपशील दिले. मात्र बॅंकेत काहीतरी समस्या असल्याचे सांगत त्याने युपीआय क्रमांक मागितला. त्याने तांत्रिक कारण देत क्यूआर कोड पाठविला व त्यात ‘ॲप्रूव्ह’वर क्लिक करायला लावले. राहुलने असे करताच त्याच्या दोन बॅंकांच्या खात्यांमधून एकूण १.८४ लाख रुपये दुसरीकडे वळते झाले. त्याने समोरील व्यक्तीला फोन केला असता त्या व्यक्तीने पैसे परत करतो असे सांगितले. मात्र त्यानंतर त्याने फोन बंद केला. आपली ऑनलाईन फसवणूक झाल्याचे लक्षात येताच राहुलने राणाप्रतानगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.