नागपूर : ऑर्केस्ट्रॉत गायन आणि वाद्य वाजविणाऱ्या कलावंताचे कोरोनापासून काम सुटल्यामुळे तो नैराश्यात जगत होता. अखेर नेरायातूनच त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी ९ जानेवारीला सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान घडली. प्रविण भिमराव मून (वय ४१, रा. बिडगाव ग्रामपंचायतजवळ, वाठोडा) असे आत्महत्या केलेल्या कलावंताचे नाव आहे. ते ऑर्केस्ट्रॉत गायन आणि वाद्य वाजविण्याचे काम करीत होते. परंतु कोरोनापासून त्यांच्या हातचे काम गेल्यामुळे ते नैराश्यात वावरत होते. त्यांच्या कुटुंबात पत्नी आणि १३ वर्षांची मुलगी आहे.
कुटुंबातील कमावता व्यक्ती बेरोजगार झाल्यामुळे कुटुंबाला आर्थिक चणचण जाणवत होती. त्यामुळे प्रविणची पत्नी काही दिवसांपासून कामाला जात होती. याच नैरायातून प्रविण यांनी मंगळवारी आपल्या राहत्या घरी सिलींग फॅनला ओढणी बांधून गळफास घेतला. या प्रकरणी त्यांची पत्नी स्वाती प्रविण मून (वय ३७) यांनी दिलेल्या सूचनेवरून वाठोडा ठाण्याचे उपनिरीक्षक रवींद्र चव्हाण यांनी अकस्मात मृत्युची नोंद करून तपास सुरु केला आहे.