लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मोबाईल दिला नाही म्हणून संतप्त बनलेल्या एका अल्पवयीन गुन्हेगाराने त्याच्यासोबत काम करणाऱ्या मजुराची हत्या केली. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी रात्री १०.३० च्या सुमारास ही थरारक घटना घडली. रिंकू सीताराम परासिया (वय ३१) असे मृताचे नाव असून तो उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगरचा रहिवासी आहे.
आरोपी अल्पवयीन आहे. रिंकू, आरोपी आणि त्यांच्यासोबतचे युपीतील चार मजूर तरोडी (वाठोडा) येथील न्यू गृहलक्ष्मी सोसायटीतील एका प्लास्टिक कंपनीत एका वर्षापासून काम करतात. दिवसभर काम करून रात्री कारखान्यातच झोपतात. रात्री ते एकत्र दारू प्यायचे. बुधवारी असेच झाले. दारूच्या नशेत असताना आरोपीचा फोन रिंकूने घेतला. त्याने त्यावरून एक फोन केला. आरोपीने रिंकूला रात्री १० ते १०.३० च्या सुमारास मोबाईल परत मागितला. पण रिंकूने मनाई केली. त्यामुळे आरोपी चिडला. त्याने मोबाईल हिसकावून जमिनीवर आपटला. तो फुटल्यानंतर त्या दोघांमध्ये जोरदार हाणामारी झाली.
त्वेषात आलेल्या आरोपीने बाजूचा लाकडी दांडा उचलून रिंकूला बेदम मारहाण केली. डोक्यावर जोरदार फटके बसल्याने रिंकू जखमी झाला. आरडाओरड ऐकून बाजूचे मजूर धावले. त्यांनी भांडण सोडविले. नंतर साथीदार आणि स्वत: आरोपीने जखमी रिंकूच्या डोक्यावर हळद लावली. जेवण करून त्याला झोपविले. सकाळी नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी त्यांनी रिंकूला आवाज दिला. पण तो प्रतिसाद देत नसल्याचे पाहून कंपनी मालक धकाते यांना माहिती दिली. त्यांनी येऊन पाहणी केली असता, रिंकू ठार झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी वाठोडा पोलिसांना कळविले.
ठाणेदार आशालता खापरे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. रिंकूचा मृतदेह रुग्णालयात रवाना करण्यात आला. एकनाथ श्रावणजी धकाते यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
आरोपी धडधाकट, वय सांगतो १५ वर्षे
आरोपी धडधाकट आहे. पोलिसांनी त्याला सकाळीच ताब्यात घेतले. त्याने आपले वय १५ सांगितले आहे. त्यामुळे पोलिसांची पंचाईत झाली आहे. त्याची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांशी संपर्क करून त्याच्या शाळेचे प्रमाणपत्र मागविले आहे. ते आल्यानंतर आरोपीला अटक करायची की नाही, ते ठरणार आहे.