नागपूर : अर्धांगवायूग्रस्त आईची सेवा करण्याचे सोडून एका कुपुत्राने चक्क तिच्या आजाराला कंटाळून तिचा जीवच घेतल्याची खळबळजनक घटना नागपुरात घडली. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.
दुर्गा रतन मेश्राम (५०, संजय गांधी नगर, गोंड मोहल्ला, राणी दुर्गावती चौक) असे मृतक महिलेचे नाव आहे. त्यांना अंकित (२५) हा मुलगा व प्रिया धनविजय (३२) ही मुलगी आहे. प्रिया त्यांच्या वस्तीतच राहते. दुर्गा यांची प्रकृती काही काळापासून खालावली होती. त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता व तसेच त्यांना रक्तदाब-मधुमेहाचादेखील त्रास होता. त्यांना नीट बोलतादेखील येत नव्हते. मुलगी येऊन जाऊन असायची व अंकित हा पेटिंगची कामे करायचा.
आईच्या आजारपणामुळे तो कंटाळला होता. गुरुवारी रात्री साडेसात वाजताच्या सुमारास त्या वस्तीत राहणारा तन्या नावाचा मुलगा सहज मेश्राम यांच्या घरी गेला असता त्यांचा मृत्यू झालेला त्याला दिसून आला. त्याने धावत जाऊन प्रिया यांना या प्रकाराची माहिती दिली. प्रिया त्यांच्या पतीसह धावत पोहोचल्या असता दुर्गा यांच्या गाल, गळ्याजवळ शस्त्राने वार केल्याच्या खुणा होत्या. त्यांना मेयो इस्पितळात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यावेळी मुलगा अंकित हादेखील तेथे होता. मात्र कुणालाही त्याच्यावर शंका आली नाही. प्रिया यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याने त्याच्या जबानीमध्ये विसंगत माहिती दिली व त्यामुळे पोलिसांना संशय आला. ठाणेदार ज्ञानेश्वर भेदोडकर व त्यांच्या पथकाने त्याला दरडावून विचारले असता त्याने हत्या केल्याची कबुली दिली.
धुणीभांडी, औषधपाण्याला कंटाळल्याचा दावा
पोलिसांनी अंकितला ताब्यात घेतल्यावर त्याने आईच्या हत्येचे जे कारण सांगितले ते ऐकून अधिकारी-कर्मचाऱ्यांनादेखील धक्काच बसला. दुर्गा या बेडवरच असल्यामुळे जेवण, स्वच्छता, औषधपाणी अंकितला करावे लागायचे. सोबतच त्याला धुणीभांडी, केरकचरादेखील करावे लागायचे. यामुळे तो कंटाळला होता. मला या प्रकारामुळे खूप त्रास व्हायचा व त्यातूनच मी हत्या केली अशी त्याने पोलिसांजवळ कबुली दिली. त्याने अगोदर उशीने दुर्गा यांचे तोंड दाबले व त्यानंतर वार केल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे.