नागपूर : ‘सायबर क्राईम’चे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून गुन्हेगारांकडून विविध प्रकारे जाळे टाकण्यात येत असल्याचे चित्र आहे. ‘पार्ट टाईम वर्क’ करण्याबाबत मोबाईलवर आलेल्या ‘एसएमएस’ची ‘लिंक’ उघडणे नागपुरातील एका व्यक्तीला महागात पडले. ‘लिंक’ उघडल्यानंतर अज्ञात आरोपींनी त्यांच्या खात्यातून ११ लाखांहून अधिकची रक्कम काढून घेतली. यासंदर्भात अजनी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
विश्वकर्मानगर येथील रहिवासी नितीन नरेश लांबसोगे यांच्या मोबाईलवर ‘पार्ट टाईम वर्क’संदर्भात ‘एसएमएस’ आला. ‘बीडब्ल्यू सेक्टर’वरून आलेल्या या ‘एसएमएस’मध्ये ‘यू आर सिलेक्टेड फॉर पार्ट टाईम वर्क फ्रॉम होम ॲन्ड इन्व्हेस्टमेन्ट’ असा संदेश होता. सोबत एक ‘लिंक’देखील दिली होती. लांबसोगे यांनी त्या ‘लिंक’ला ‘क्लिक’ केले व सांगितलेली प्रक्रिया केली.
काही काळाने त्यांच्या खात्यातून ११ लाख ६३ हजार रुपये अज्ञात व्यक्तीच्या खात्यात वळते झाल्याचे लक्षात आले. हे पाहून त्यांना धक्काच बसला व त्यांनी अजनी पोलीस ठाणे गाठले. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.