नागपूर : फोनवरील तथाकथित व्यापाऱ्यावर विश्वास टाकणे एका पेपर व्यापाऱ्याला चांगलेच महागात पडले. समोरील व्यक्तीने पेपरविक्रीचा ऑर्डर घेत १.५५ लाखांनी गंडविले. कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
सुशिल उदयप्रकाश मेहाडिया (५०, कृष्णा अपार्टमेंट, कडबी चौक) यांचे कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उप्पलवाडी इंडस्ट्रीज एरियामध्ये पेपर ॲंड लेबल प्रॉडक्ट इंडिया प्रा.लि.ही कंपनी आहे. त्यांना २१ सप्टेंबर रोजी ७०५७६३९८९४ या क्रमांकावरून फोन आला. समोरील व्यक्तीने स्वत:चे नाव गौरव पवार असे सांगितले व तो गोदावरी एंटरप्रायझेसमधून बोलत असल्याची बतावणी केली.
पेपर विक्रीचा व्यवसाय असल्याचे सांगत त्याने सुशिल यांना पेपर विकण्याची तयारी दाखविली. सुशिल यांनी विश्वास ठेवत त्याला पेपरची ऑर्डर दिली व १.५५ लाखांचा ऑनलाईन ॲडव्हान्स दिला. मात्र समोरील व्यक्तीने कुठल्याही पेपरचा पुरवठा केला नाही व संपर्कदेखील तोडला. अखेर सुशिल यांनी कपिलनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे.