नागपूर : पतंग उडवण्यास नकार दिल्याच्या वादातून एका तरुणाने भरदिवसा रस्त्यावर गुन्हेगाराची हत्या केली. ही घटना पाचपावली येथील बेलीशॉप क्वार्टरमध्ये घडली. हिवाळी अधिवेशन काळातील ही तिसरी हत्या असून यामुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. शंकर कोतुलवार (४०, भिलगाव) असे मृतकाचे नाव असून पोलिसांनी आरोपी लोकेश गुप्ता (२१, बेलीशॉप क्वॉर्टर) याला अटक केली आहे.
शंकर हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता व त्याच्यावर २० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. तो पानठेला चालवत होता. मागील काही काळापासून तो शांत होता. शंकरची आई बेलीशॉप क्वार्टरमध्ये राहते. तो अनेकदा आईला भेटायला यायचा. मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता शंकर आईला भेटण्यासाठी आला. लोकेश त्याच्या आईच्या घरापासून काही अंतरावरच राहतो. शंकरच्या आईच्या घराजवळ तो पतंग उडवत होता.
शंकरने त्याला पतंग उडविण्यास मनाई केली व मांजा घराजवळून जाऊ नये असा इशारा दिला. त्याने अगोदरदेखील पतंग उडविण्यास मनाई केली होती. त्यामुळे लोकेशला राग आला व त्याने वाद सुरू केला. काही वेळाने लोकेश घरी गेला. मात्र तो चाकू घेऊन परतला व शंकरवर हल्ला केला. शंकरला सावरण्याची संधीदेखील मिळाली नाही. शंकरवर त्याने वार केले व त्यात तो जखमी झाला. शेजाऱ्यांनी त्याला खासगी रुग्णालयात नेले. परंतु त्याचा मृत्यू झाला.
हिवाळी अधिवेशनात भरदिवसा रस्त्यावर खुनाची घटना घडल्याने पोलिस तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी लोकेशचा शोध सुरू केला. काही वेळाने तो शरण आला. हिवाळी अधिवेशन १९ डिसेंबरपासून सुरू झाले. त्याच दिवशी वाडीतील वडधामना येथे दारू तस्करांनी प्रतिस्पर्धी गुन्हेगार योगेश मेश्राम आणि सलमान गजभिये यांची हत्या केली. या प्रकरणातील आरोपींनीही आत्मसमर्पण केले होते. त्याचे मदतनीस अद्याप पकडलेले नाहीत. हिवाळी अधिवेशनासाठी सात हजारांहून अधिक पोलिस कर्मचारी रस्त्यावर आहेत. खून किंवा अन्य मोठे गुन्हे रोखण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांना कडक सूचना देण्यात आल्या आहेत. दोषींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. असे असतानाही हत्या होत असल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.