लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :बँकेतनोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून अनेक बेरोजगारांकडून लाखो रुपये उकळणाऱ्या तसेच त्यांना बनावट नियुक्तिपत्र देणाऱ्या भामट्याविरुद्ध सदर पोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल केला.
सचिन सुरेश आठवले (वय ३५, रा. कोराडी नाका) असे आरोपीचे नाव आहे. त्याने सदरमधील मंगळवारी कॉम्प्लेक्सच्या चौथ्या माळ्यावर ग्लोबल अर्थ टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस नावाने काही महिन्यांपूर्वी ऑफिस थाटले. येथून सचिन आठवले नावाचा हा भामटा बेरोजगारांना बँकेतनोकरी देण्याचे आमिष दाखवत होता. त्या बदल्यात तो लाखो रुपये घ्यायचा.
त्याने १२ ऑगस्ट २०२० ते १५ एप्रिल २०२१ या कालावधीत अनेक तरुणांकडून लाखो रुपये घेऊन त्यांना वेगवेगळ्या बँकेचे नियुक्तिपत्र दिले. जॉईनिंगसाठी संबंधित तरुण बँकेत गेल्यानंतर आरोपी आठवलेच्या भामटेगिरीचा खुलासा झाला. त्यानंतर त्याने रक्कम परत करतो म्हणून संबंधितांना झुलविणे सुरू केले. सात महिने होऊनही त्याने रक्कम परत केली नाही. त्यामुळे अनेकांनी पोलिसांकडे धाव घेतली.
अखेर गुन्हा दाखल
सदर पोलिसांनी तनवीर खान साहेब खान (वय ३८) यांच्या तक्रारीवरून आरोपी आठवलेविरुद्ध रविवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. खान यांच्या तक्रारीनुसार, आरोपीने प्रारंभी त्यांना आणि सहकाऱ्यांना ८ लाख ५० हजार रुपये आपल्या खात्यात जमा करायला सांगितले. नंतर २ लाख ५० हजार रुपये रोख स्वरूपात घेतले. आतापर्यंत आपली रक्कम परत मिळेल, या आशेने अनेक पीडितांनी पोलिसांकडे तक्रार करण्याचे टाळले. मात्र, आता आठवलेविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यामुळे पीडितांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.