नागपूर : जन्मदात्या आईवर बलात्कार करणाऱ्या नराधम मुलाला सत्र न्यायालयाने जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. न्या. ए.एम. देशमुख यांनी गुरुवारी हा निर्णय दिला. ही घटना वाठोडा पोलिसांच्या हद्दीतील आहे.
आरोपी मुलगा ३२ वर्षांचा असून तो व्यवसायाने मजूर आहे. त्याचे लग्न झाले होते. परंतु, त्याच्या विकृत स्वभावामुळे पत्नीला सासरी राहणे कठीण झाले. परिणामी, तिने या घटनेच्या तीन वर्षांपूर्वी घटस्फोट घेतला. पीडित आई धुणीभांडी करून जीवन जगते. ती आरोपीचीही काळजी घेत होती.
असे असताना २१ जून २०२१ रोजी मध्यरात्री आरोपीने ताळतंत्र सोडून आईलाच वासनेची शिकार केले. असहाय आई स्वत:ला सोडविण्यासाठी सतत विनवणी करीत होती. परंतु, आरोपीमधील सैतानाने पवित्र नात्याला काळे फासूनच तिला सोडले. त्यानंतर पोलिसांनी आईच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला व त्याला अटक केली. पोलीस उपनिरीक्षक अमित बकतवार यांनी प्रकरणाचा तपास केला. न्यायालयात सरकार पक्षाने आई व इतर साक्षीदारांचे जबाब आणि डीएनए अहवाल यावरून आरोपीवरील गुन्हा सिद्ध केला. सरकारच्या वतीने ॲड. रश्मी खापर्डे यांनी कामकाज पाहिले.