नागपूर :
गुगलवरून जगभरातील क्रांतीकारकांच्या जीवन पद्धतीचा अभ्यास करताना त्याची वैचारिक क्रांती कशी होत गेली, ते त्याचे त्यालाच कळले नाही. त्याचे विश्वच बदलले. त्या स्थितीत तो चक्क युनियन (आर्मी) तयार करण्यासाठी आपले गाव, आपला प्रांत सोडून सुसाट कर्नाटककडे निघाला. काही तरी वेगळे होत आहे, याची त्याच्या कुटुंबियांना कल्पना आली. त्यामुळे त्यांनी लगेच धावपळ सुरू केली अन् बिहारच्या १८ वर्षीय तरुणाची क्रांती एक्सप्रेस रेल्वे पोलिसांनी नागपुरात रोखली. एखाद्या ओटीटीवरच्या सिरियलचा वाटावा, असा हा घटनाक्रम आहे.
बिहारच्या पंचमढी जिल्ह्यातील समिर (नाव बदललेले) याला त्याच्या दोन मोठ्या भावांकडून अभ्यासाचे बाळकडू मिळाले. अभ्यासाच्या बळावर त्याचे दोन भाऊ चार्टर्ड अकाउंटंट होण्यासाठी दिल्लीत प्रयत्न करीत आहेत. घरी सधन आईवडिलांसोबत समीर होता. १२ वी पर्यंत प्रत्येक परिक्षेत चांगले मार्क्स मिळविणाऱ्या समिरने नुकतीच फर्स्ट ईयरला अॅडमिशन केली. अभ्यासासाठी घरी चांगले वातावरण, त्यात मोबाईल, लॅपटॉप हाताशी. त्यामुळे समीर स्वत:च्या रुमचे दार बंद करून दररोज १०-१२ तास अभ्यासात गुंतवून घेत होता. आईवडिलांना तो अभ्यास करतो एवढेच माहिती होते. नेमका अभ्यास कशाचा करतो, त्याबाबतची चाैकशी करण्याची गरज त्यांना भासली नाही. ईकडे गुगलच्या माध्यमातून समीर देश-विदेशातील मोठमोठे नेते, जागतिक क्रांती आणि क्रांतीकारकाचा अभ्यास करू लागला. हे करताना त्याच्यावर स्वातंत्र्यवीर सावरकर, सुभाषचंद्र बोस यांचा प्रचंड प्रभाव पडला. नुसता प्रभावच पडला नाही तर तो असा काही झपाटला की त्याचे विश्चच बदलले. गेल्या काही दिवसांपासून तो क्रांतीकारकांच्या अविर्भावात वावरत असल्याचे घरच्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्याला आपल्या पद्धतीने विचारणा केली, समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो कसला मानतो. देश बदलण्याची गरज त्याला अस्वस्थ करू लागली. सुभाषबाबूंसारखी एक कथित आर्मी तयार करायची अन् देशाची स्थिती बदलायची, या विचाराने झपाटलेल्या समीरने दिवाळीच्या पर्वावर सिमोल्लंघन करण्याची मनोमन योजना आखली होती. ही फाैज कर्नाटकच्या राजधानीतून संचालित करता येईल, अशी त्याची खात्री होती. त्यामुळे त्याने ८ नोव्हेंबरला भल्या पहाटे बिहारमधून बेंगळुरूकडे कूच केले. तो घरून निघून गेल्याचे लक्षात येताच हादरलेल्या आईवडिलांनी शेजाऱ्यांच्या मदतीने पोलिसांकडे धाव घेतली. बिहार पोलिसांनी मिसिंग दाखल करून शोधाशोध सुरू केली. समीर संघमित्रा एक्सप्रेसच्या कोच नंबर एस-६ मधून निघाल्याचे कळताच या रूटवरील सर्व रेल्वे पोलिसांना समीरचे फोटो आणि अन्य माहिती देऊन त्याला शोधण्याचे आवाहन केले. त्यानुसार, गुरुवारी संघमित्रा एक्सप्रेस नागपूर स्थानकावर येताच येथील रेल्वे पोलिसांनी त्याची शोधाशोध केली.क्रांतीकारकाचा अविर्भावरेल्वेे पोलिसांना अखेर समीर सापडला. त्याला जीआरपी ठाण्यात आणून पोलिसांनी त्याची विचारपूस सुरू केली. क्रांतीकारकाला पोलीस वेळोवेळी अडवतात, अशी भावना झाल्याने समीर आपल्याच थाटात वागत होता. सुभाषबाबूंच्या आझाद हिंद सेनेच्या धर्तिवर त्याला फाैज निर्माण करायची होती. त्याचमुळे पोलीस आपल्याला अडवून ठेवत असल्याचा त्याचा अविर्भाव होता.१२ तासांचे काऊंसिलिंग, अन्...रेल्वे पोलीसच्या वरिष्ठ निरीक्षक मनीषा काशिद, हवलदार जिचकार, अंमलदार यादव यांनी बिहार पोलिसांच्या माध्यमातून समीरच्या नातेवाईकांना तो सापडल्याचे कळविले. त्यानुसार, त्याचे आईवडील शुक्रवारी सायंकाळी नागपूर रेल्वे स्थानकावर पोहचले. ते येईपर्यंत तब्बल १० ते १२ तास रेल्वे पोलिसांनी समीरचे काऊंसिलिंग केले. मात्र, तो मानेना. पोलिसांनी त्याचे मन वळविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. अखेर आईवडिलांसोबत जाण्यास तो राजी झाला अन् सर्वांचाच जीव भांड्यात पडला.