नागपूर : रस्त्यावरून जात असताना दुचाकीवरून घसरलेल्या इसमाला मदत न करता उलट त्याला मारहाण करत लुटणाऱ्या चोरट्यांना अखेर पोलिसांनी अटक केली आहे. सीसीटीव्ही व इतर तांत्रिक तपासामुळे चोरटे पोलिसांना गवसले. नंदनवन पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.
सचिन चंद्रभान चौधरी (३९, चिटणीसनगर, उमरेड रोड) हे ११ सप्टेंबर रोजी अडीच वाजताच्या सुमारास एनआयटी बस पार्किंग, जगनाडे चौक येथून जात असताना दुचाकी घसरल्याने ते खाली पडले. त्यांच्या हातापायाला लागले व त्यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. तेथून तीन अनोळखी व्यक्ती चालले होते व ते तेथे आले. त्यांच्याकडून मदत होईल या अपेक्षेत सचिन असतानाच आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली व त्यांच्या खिशातील १६ हजार रुपये हिसकावून ते पळून गेले. सचिन यांच्या तक्रारीवरून नंदनवन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच तांत्रिक तपासाच्या माध्यमातून सिद्धार्थ अनिल पिल्लेवान (२२, शास्त्रीनगर झोपडपट्टी) हा सहभागी असल्याची बाब कळाली. पोलिसांनी सापळा रचून त्याला व त्याचे साथीदार असलम खान फिरोज खान (२२, हसनबाग), नवाज खान रफीक खान (२२, टिमकी चौकीजवळ, तहसील) यांचा ताब्यात घेतले. त्यांची झाडाझडती घेतली असता अगोदर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसी खाक्या दाखविल्यावर त्यांनी गुन्ह्याची कबूल केली. पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे.