लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने देह व्यापारासाठी मुलीला विकणाऱ्या आरोपीची अटकपूर्व जामीन देण्याची विनंती फेटाळून लावली. न्यायमूर्तीद्वय झेड ए़ हक व अमित बोरकर यांनी हा निर्णय दिला. अलीकडे देह व्यापारासाठी मुलींना विकण्याचे गुन्हे वाढले आहेत, असे मत न्यायालयाने हा निर्णय देताना व्यक्त केले.
जमनालाल देविलाल गडवाल असे आरोपीचे नाव असून, तो पारडी येथील रहिवासी आहे. गडवाल व इतर आरोपींनी एका मुलीला राजस्थानमध्ये २ लाख ५० हजार रुपयांत विकले अशी पोलीस तक्रार आहे. आरोपींविरुद्ध इमामवाडा पोलिसांनी बलात्कार, अॅट्रॉसिटी यासह विविध गुन्ह्यांतर्गत एफआयआर नोंदवला आहे. गडवालने अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी सुरुवातीला सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. १६ डिसेंबर २०२० रोजी सत्र न्यायालयाने तो अर्ज खारीज केला. त्यामुळे त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. गडवाल हा कुख्यात गुन्हेगार आहे. त्याने यापूर्वीही अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत. जामिनावर सोडल्यास तो पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करू शकतो असे सरकार पक्षाने न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने यासह विविध बाबी लक्षात घेता गडवालचे अपील फेटाळून लावले.