‘कर्म या भाग्य’ विषयावर व्याख्यान : ब्रह्माकुमारी शिवानी बहन यांचे प्रतिपादन नागपूर : मनुष्याच्या इच्छा व आकाक्षांना मर्यादा नसतात. प्रत्येक व्यक्तीच्या मनात अनेक इच्छा असतात. शिवाय भविष्यात त्या प्राप्त करण्याच्या विचाराने तो वर्तमानात दु:खी होतो. त्यामुळे आम्ही जेथे असतो, तेथे आमचे मन स्थिर न राहता, दुसऱ्याच कल्पनांच्या शोधात भटकत असते. त्यामुळेच सर्वप्रथम मनाला नियंत्रित करणे आवश्यक आहे. सामान्यत: आमच्या जीवनात जे सुरू आहे, ते सर्व परमेश्वर करीत आहे, असा आम्ही विचार करतो. परंतु मनुष्याच्या जीवनाचे ‘स्क्रिप्ट’ जर परमेश्वराने लिहिले असते, तर त्याने सर्वांना सुखी केले असते. त्याने कुणाला सुखी व कुणाला दु:खी केले नसते. कारण प्रत्येकजण परमेश्वराची लेकरं आहोत. त्यामुळे सर्वांचे जीवन सारखे असते. परंतु मनुष्याच्या जीवनाचे ‘स्क्रिप्ट’ हे परमेश्वराने नव्हे, तर मनुष्याने स्वत:च लिहिले आहे. आम्ही जे पूर्वी कर्म केले किंवा जे सध्या करीत आहोत, त्याचेच फळ आज भोगत आहो. जे चांगले केले, त्याचे चांगले फळ आणि जे वाईट केले, त्याचे वाईट फळ मिळत आहे. कोणत्याही आई-वडिलांची इच्छा आपल्या मुलाला दु:खी पाहण्याची नसते. त्यामुळे परमेश्वर आपल्या लेकरांना कसे दु:खी करू शकतो. मनुष्य जे दु:ख भोगत आहे, ते ‘स्क्रिप्ट’ त्याने स्वत:च लिहिले आहे. शिवाय तो ते ‘स्क्रिप्ट’ प्रत्येक क्षणी लिहीत आहे. म्हणजेच आम्ही आपल्या कर्मातून आपले भाग्य लिहीत असल्याचे विचार जगविख्यात ब्रह्माकुमारी शिवानी बहन यांनी व्यक्त केले. ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्यावतीने मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ‘कर्म या भाग्य’ या विषयावर शिवानी बहन यांनी रविवारी व्याख्यान दिले. त्यांना ऐकण्यासाठी संपूर्ण स्टेडियम भरगच्च भरले होते. यावेळी मंचावर प्रख्यात अभिनेते सुरेश ओबेरॉय व ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, विदर्भ शाखेच्या प्रमुख पुष्पारानी दीदी उपस्थित होत्या. शिवानी बहन पुढे म्हणाल्या, कर्म केवळ हात किंवा शरीरानेच, नव्हे तर मन आणि विचारांनी सुद्धा होते. मनात विचार करणे, हे सुद्धा कर्मच आहे आणि यात चांगला विचार, म्हणजे चांगले कर्म केल्यासारखे आहे. त्यामुळे चांगले-वाईट कर्म मनानेसुद्धा केले जाऊ शकते. प्रत्येक व्यक्तीला सुखी जीवन जगायचे असते. शिवाय त्यासाठी तो जीवनभर परिश्रम करतो. सुखी व समृद्ध राहण्यासाठी परिश्रम करावेच लागतात, ही समाजाची परंपरा आहे. परंतु काही लोक कमी परिश्रम करून सुद्धा सुखी व समृद्घ जीवन जगत असल्याचे आपल्या सभोवताल दिसून येते. तर त्याचवेळी काहीजण दिवसरात्र परिश्रम करून सुद्धा सामान्य व कष्टमय जीवन जगतात. कुणाच्या समोर काहीच समस्या नसतात तर कुणी प्रामाणिक असून सुद्धा दु:खाने पीडित असतो. कुणी पाप करीत असले, तरी भौतिक जीवनाचा आनंद घेतात. तर अनेकजण प्रामाणिक व साधे जीवन जगत असताना सुद्धा त्यांना अनेक संसारिक दु:खांचा सामना करावा लागतो. यामुळे भाग्यासारख्या शक्तीचे अस्तित्व तर नाही, ना, असा विचार करण्यास भाग पडते. जर भाग्य आहे, तर त्याचे रहस्य काय? अशा या गूढ विषयाची सुद्धा यावेळी ब्रह्माकुमारी शिवानी बहन यांनी सहज उकल करून, उपस्थित श्रोत्यांना अध्यात्माच्या खोलीचा परिचय करून दिला. दरम्यान यावेळी प्रामुख्याने उपस्थित सुरेश ओबेरॉय यांनी सुद्धा आपले अनुभव कथन केले.(प्रतिनिधी)
मनुष्य कर्मातून लिहितो भाग्य!
By admin | Published: February 29, 2016 2:44 AM