नागपूर : विदर्भातील वाघांची वाढती संख्या, जागेचे व्यस्त प्रमाण, यातून उद्भवणाऱ्या मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटना यांसह अनेक महत्त्वाच्या विषयांवर सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वन विभागाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. वन व्यवस्थापन करताना वाघांचेही योग्य व्यवस्थापन होईल याकडे लक्ष देण्याच्या आणि व्याघ्र कक्षाच्या बैठका नियमित घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
दूरदृष्यप्रणालीद्वारे झालेल्या या बैठकीला पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, पोलीस महासंचालक संजय पांडे, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) जीतसिंह, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये, नागपूरच्या विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मीना, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, कांदळवन कक्षाचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक वीरेंद्र तिवारी, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक जितेंद्र रामगावकर, राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य बंडू धोत्रे, अनिष अंधेरिया प्रामुख्याने उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, पोलिसांची मदत घेऊन तसेच स्थानिकांना विश्वासात घेऊन खबऱ्यांचे जाळे निर्माण करा. विदर्भात अलीकडे झालेल्या वाघांच्या शिकारीच्या घटनांवर त्यांनी चिंता व्यक्त केली. हे टाळण्यासाठी जनजागृतीसोबतच कायद्याची कडक अंमलबजावणी करा, गरजेचे वाटल्यास आवश्यकतेनुसार कायद्यात बदलही करावा, अशा सूचना त्यांनी केल्या.
अपघातप्रवण स्थळ निश्चित करा
ज्या ठिकाणी वन्यजीवांचे अपघात होतात, अशी ठिकाणे निश्चित करून पर्यायी उपाययोजना राबविण्यात याव्यात. जंगलात विकासकामे करताना विशेषत: रेल्वे लाईनचे नियोजन करताना राज्याच्या वन विभागाशी चर्चा करून नियोजन केले जावे, असेही मुख्यमंत्र्यांनी सुचविले.
नव्या संवर्धन राखीव क्षेत्रांचा व्यवस्थापन आराखडा तयार करा : आदित्य ठाकरे
शासनाने नव्याने जाहीर केलेल्या संवर्धन राखीव क्षेत्रांचा व्यवस्थापन आराखडा लवकर तयार करावा, अशा सूचना पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिल्या. हे संवर्धन राखीव घोषित केल्याने संरक्षित वन क्षेत्रातले ग्रीन कव्हर वाढले का, हे पाहिले जावे, पुनर्जीवनीकरण करणे आवश्यक असलेल्या ठिकाणी व महामार्गालगतही वृक्ष लागवडीचा विचार केला जावा, असेही ते म्हणाले.
...