सैयद मोबीन।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय महामार्ग क्र. ६९ वरील मानकापूर स्टेडियम चौक वाढत्या अपघातामुळे ‘ब्लॅक स्पॉट’ बनला आहे. उड्डाणपूल बनल्यानंतर अपघातांची संख्या वाढली आहे. चौकात सिग्नल असल्यानंतर साईड लेनमधून येणाऱ्या वाहनांना सिग्नलचा फायदा मिळत नसल्याने वाहनचालक सिग्नल तोडतात आणि त्यामुळे अपघात होतात. अपघातावर नियंत्रण आणण्यासाठी जयहिंदनगर आणि न्यू मानकापूरच्या मध्य भागातून जाणारा रस्ता दुभाजकाच्या माध्यमातून बंद होणार आहे. मानकापूर स्टेडियम चौक (कल्पना टॉकीज चौक) ते फरस फाट्यापर्यंत उड्डाणपूल बनल्यानंतरच साईड लेनमधून येणाऱ्या वाहनचालकांना रस्ता पार करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे.मानकापूरकडून साईल लेनकडून येणाºया वाहनांना जर जयहिंदनगरकडे जायचे असेल तर यू-टर्न घेणे अत्यंत कठीण काम आहे. कारण उड्डाणपुलावर उभे वाहन हिरवा सिग्नल मिळाल्यानंतर जयहिंदनगरकडे जाऊन यू-टर्न घेतात. यादरम्यान साईड लेनमधील वाहनचालक सिंग्नल तोडत असल्यामुळे अपघाताला आमंत्रण मिळते. ही समस्या मानकापूर स्टेडियमकडून यू-टर्न घेणाऱ्या वाहनचालकांची आहे. पागलखाना चौकाकडून येणारे वाहन हिरवा सिंग्नल मिळताच मानकापूर उड्डाणपुलावर जाऊन यू-टर्न घेतात. पण स्टेडियमकडून येणाऱ्या वाहनचालकांना या चौकातून यू-टर्न घेणे अत्यंत जोखिमेचे काम आहे. दोन्ही बाजूने वाहने वेगात येतात. त्यानंतर वाहनचालक जोखिम घेऊन यू-टर्न घेतात. यामुळेच या चौकात दरदिवशी अपघात होतात.अपघातावर नियंत्रण मिळविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) पागलखाना चौकातून रिझर्व्ह बँकेपर्यंत तयार होत असलेल्या उड्डाणपुलासोबतच मानकापूर स्टेडियम चौकात दुभाजक बनविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जयहिंदनगर आणि न्यू मानकापूरदरम्यानचा थेट रस्ता बंद होणार आहे. त्यामुळे जयहिंदनगर येथून न्यू मानकापूरला जाणाऱ्या वाहनांना मानकापूर चौकाकडे जाऊन भूमिगत मार्गाने यू-टर्न घेऊन परत यावे लागेल. याचप्रकारे न्यू मानकापूरकडून जयहिंदनगरकडे जाणाºया वाहनांना पागलखाना चौकाकडे जाऊन प्रस्तावित भूमिगत मार्गातून यू-टर्न घेऊन परत यावे लागेल.
... तर फरस फाट्यासारखे हाल होणारजशी व्यवस्था मानकापूर स्टेडियम चौकात प्रस्तावित आहे, तशीच व्यवस्था फरस-मानकापूर घाटाजवळ करण्यात आली आहे. मानकापूर स्टेडियम चौकात दुभाजक बनल्यानंतर महामार्गावरून येणाऱ्या गाड्या वेगात जातील. अशावेळी न्यू मानकापूर ते पागलखानाकडे आणि जयहिंदनगर येथून मानकापूर चौकाकडे वळणाऱ्या वाहनांची महामार्गावरून वेगात जाणाऱ्या वाहनांशी धडक होण्याची शक्यता राहणार आहे. तर दुभाजक ओलांडून जाणाऱ्या पादचाऱ्यांचा अपघात होण्याची शक्यता जास्त आहे. यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना जबाबदारीने रस्ता पार करावा लागेल.
मानकापूर स्टेडियम चौकात होणाऱ्या अपघातावर नियंत्रण मिळविण्यासाठी योजना तयार आहे. पागलखाना चौक ते रिझर्व्ह बँकेपर्यंत उड्डाणपूल तयार करण्यात येत आहे. मानकापूर स्टेडियम चौकात दुभाजक तयार करण्यात येत असल्यामुळे जयहिंदनगर आणि न्यू मानकापूर यादरम्यानचा थेट रस्ता बंद होईल. त्यामुळे दोन्ही भागातील वाहनांना चौकातून जाण्यासाठी भूमिगत मार्गाचा उपयोग करावा लागेल. यामुळे अपघात होणार नाहीत.- एम. चंद्रशेखर,महाव्यवस्थापक, एनएचएआय.