यशस्वी पुढाकार : अपर आयुक्त सोनवणे यांनी स्वीकारला पुरस्कारनागपूर : देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्ती, संस्था, राज्य आणि प्रकल्पांना वन ग्लोब फोरमतर्फे ‘वन ग्लोब अवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात येते. यावर्षी नागपूर महापालिकेला स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी यशस्वी पुढाकार घेतल्याने हा पुरस्कार मिळाला आहे. नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री पी.पी. चौधरी यांच्याहस्ते अपर आयुक्त व स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.नागपूर स्मार्ट अॅण्ड सेफ सिटी प्रकल्पांतर्गत नागपूर शहरात राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांमुळे या पुरस्कारासाठी महापालिकेची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. यासोबतच महाराष्ट्र राज्याच्या माहिती व तंत्रज्ञान विभागालाही पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ‘स्मार्ट’ राज्य म्हणून सक्षम करण्यात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. राज्याच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या प्रधान सचिवांच्या वतीने सोनवणे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.सोनवणे यांनी सदर पुरस्कार सोमवारी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी अप्पर आयुक्त रवींद्र कुंभारे, उपायुक्त रवींद्र देवतळे उपस्थित होते. या पुरस्कारामुळे अधिकाऱ्यांचा उत्साह वाढला असून स्मार्ट सिटीचे कार्य अधिक वेगाने होईल, असा विश्वास हर्डीकर यांनी यावेळी व्यक्त केला.(प्रतिनिधी)
स्मार्ट सिटीसाठी मनपाला ‘वन ग्लोब अवॉर्ड’
By admin | Published: February 14, 2017 2:12 AM