नागपूर : ओबीसीची जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे या मुख्य मागणीसाठी विदर्भात पुन्हा एकदा मंडल यात्रा काढण्यात येणार आहे. या मंडल यात्रेच्या माध्यमातून जातिनिहाय जनगणना व वसतिगृह, शिष्यवृत्तीसह इतर विषयांवरही लोकांमध्ये जनजागृती केली जाईल. येत्या ३० जुलैपासून नागपुरातील संविधान चौक येथून या यात्रेला सुरुवात होईल.
ओबीसी युवा अधिकार मंच आणि विदर्भातील इतर ओबीसी आणि भटक्या विमक्त संघटनांच्या काही निवडक पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सिव्हील लाईन्स येथील एमटीडीसीच्या सभागृहात रविवारी ही बैठक पार पडली. या बैठकीत मंडल यात्रा संयोजक उमेश कोर्राम, बळीराज धोटे,दीनानाथ वाघमारे,खेमेंद्र कटरे, भुमेश्वर शेंडे,गोपाल सेलोकर, अनिल डहाके, विलास माथनकर,माजी खासदार डॉ.खुशाल बोपचे, डॉ.अंजली साळवे, अतुल खोब्रागडे, सुनील पाल, पियूष आकरे, देवेंद्र समर्थ, मनीष गिरडकर,प्रतीक बावनकर, प्रलय मशाखेत्री, मुकुंद अडेवार, राजेंद्र बढिये , सोनू फटींग, निलेश तिघरे, अरविंद क्षिरसागर, विशाल पटले आदी उपस्थित होते.जातिनिहाय जनगणनेसोबतच ओबीसी समाजाची लोकसंख्या बघता प्रत्येक जिल्ह्यात १० वसतिगृह सुरू व्हावे, स्वाधार योजना सूरू करावी, स्वाधार योजनेत प्रत्येक जिल्ह्यातून दोन हजार विद्यार्थी समाविष्ट करण्यात यावे.विदेश शिष्यवृत्ती योजनेत ५० विद्यार्थी मान्य केलेत परंतु लोकसंख्या बघता ५०० विद्यार्थांना शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे. आर्थिक विकास महामंडळामार्फत युवकांना उद्योगासाठी १ हजार कोटी रुपयांचे कर्ज वाटप आणि उद्योग प्रशिक्षण मिळावे, आदी मागण्या या दरम्यान करण्यात येतील.
- दोन टप्प्यात होणार मंडल यात्रा
ही मंडल यात्रा दोन टप्प्यात निघणार आहे. पहिला टप्पा ३० जुलै राेजी संविधान चौक नागपूर येथून सकाळी ११ वाजता निघेल नागपूर,भंडारा,गोंदिया,गडचिरोली, वर्धा,यवतमाळ या जिल्ह्यातून प्रवास करत चंद्रपूर शहरात मंडल दिवशी ७ ऑगस्ट ला यात्रेच्या पाहिल्या टप्प्याचा समारोप होईल.दुसरा टप्पा २० ऑगस्ट रोजी राजमाता जिजाऊ जन्मस्थळ सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा येथून सुरू होईल आणि अकोला,वाशिम जिल्ह्यातून प्रवास करत २५ ऑगस्ट मंडल जयंतीच्या दिवशी अमरावती येथे दुसऱ्या टप्प्याचा समारोप होईल.