कुही : कुही तालुक्यातील मांढळ येथील ग्रामपंचायतीची ग्रामसभा शुक्रवारी गोंधळात पार पडली. तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने घेण्यात आली. त्यामध्ये विनोद ठवकर अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाले.
मांढळ ग्रामपंचायतीच्या आवारात या सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेला सरपंच शाहू कुलसंगे गैरहजर होते. यानंतर ग्रा. पं.चे माजी सदस्य गोवर्धन लांडगे यांच्या अध्यक्षतेत सभा घेण्यात आली. तीत उपस्थित नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, गावातील अंतर्गत रस्त्यांची झालेली वाताहत, नालीवरील तुटलेली झाकणे, तुंबलेल्या नाल्या, डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव याकडे अध्यक्षांचे लक्ष वेधले. नळाचे पाणी व्यवस्थित मिळत नसल्याने पाणी कर भरणार नाही, असे नागरिकांनी यावेळी खडसावून सांगितले. सचिव गाकरे यांनी गत सभेच्या इतिवृत्ताचे वाचन केल्यानंतर त्या सभेत निर्णय झालेल्या विषयांची अंमलबजावणी न झाल्याने प्रचंड गोंधळ झाला. पटलावर असलेले विषय गोंधळातच पारित करण्यात आले. ग्रामविकास अधिकारी गाकरे हे गत महिन्यात या ग्रा. पं.ला रूजू झाले. त्यांनी दीड महिन्यातच सरपंच व उपसरपंच यांना हाताशी धरून इतर सदस्यांना विश्वासात न घेता स्वतःच्या मर्जीने खर्च केला. त्यामुळे त्यांच्या बदलीची मागणी करण्यात आली. खंडविकास अधिकारी यांनी सदस्यांची मागणी मान्य करीत त्यांची बदली केली.
तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक
गोंधळात सभा सुरु असताना तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले. तीत माजी अध्यक्ष विनोद ठवकर, नरेश राऊत व अरुण डोंगरे यांची नावे अध्यक्षपदासाठी सुचविण्यात आली. अध्यक्षपदासाठी उमेदवारांची संख्या जास्त असल्याने मतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आला. यात १८१ नागरिकांनी मतदान केले. यात मतमोजणीदरम्यान तीन मते अवैध ठरली. १७८ मतांमधून विनोद ठवकर यांना १०३, नरेश राऊत यांना ५८, तर अरुण डोंगरे यांना १७ मते मिळाली. तात्पुरत्या निर्वाचन अधिकारी पं. स. सदस्य मंदा डहारे यांनी विनोद ठवकर हे विजयी झाल्याचे जाहीर केले. उपसरपंच सुखदेव जिभकाटे, सदस्य प्रदीप कुलरकर, राजेश तिवस्कर, संजय निरगुळकर, आशिष आवळे, मोना बुध्दे, गीता सोनकुसरे आदी याप्रसंगी उपस्थित होते.