नागपूर : मंगळसुत्र आणि मोबाईल हिसकावणाऱ्या दोन कुख्यात आरोपींना गुन्हे शाखेच्या युनिट तीनने अटक करून त्यांच्या ताब्यातून ६ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मोहम्मद इरफान शमशाद अंसारी (वय १९, रा. गेम्स स्टुडिओजवळ पारडी, भांडेवाडी) आणि संदिप विजय शाहु (वय २२, रा. हनुमाननगर, भांडेवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. २१ जूनला दुपारी १२.१० वाजता शोभा मधुकर निंबुळकर (वय ५७, रा. स्वराज कॉलनी अजनी) या लोहमार्ग पोलिस पेट्रोल पंपाजवळ उभ्या होत्या. तेवढ्यात दुचाकीवरून आलेल्या दोन आरोपींनी त्यांच्या गळ्यातील दोन मंगळसुत्र हिसकावून पळ काढला.
शोभा यांच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी आरोपींविरुद्ध कलम ३९२, ३४ नुसार गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याच्या समांतर तपासात गुन्हे शाखेच्या युनिट तीनला मिळालेल्या गुप्त माहितीवरून व तांत्रीक तपासातून त्यांनी सापळा रचून दोन्ही आरोपींना अटक केली. त्यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तसेच नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दोन मोबाईल हिसकावल्याचे सांगितले. त्यांच्याकडून एक मंगळसुत्र व ३५ गॅम सोन्याची लगडी व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, दोन मोबाईल असा एकुण ४.३८ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याशिवाय विविधकंपन्यांचे १६ मोबाईल किंमत २.३२ लाख असा एकुण ६ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई अप्पर पोलिस आयुक्त (गुन्हे) संदिप पाटील, उपायुक्त मुम्मका सुदर्शन, सहायक पोलिस आयुक्त संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सागडे, सहायक पोलिस निरीक्षक पवन मोरे, उपनिरीक्षक मधुकर कोठाके, बलराम झाडोकर, सतीश पांडे, दशरथ मिश्रा, शाम अंगथुलेवार, विजय श्रीवास, फिरोज शेख, विशाल रोकडे, रवींद्र करदाते, जितेश रेड्डी, दिपक दासलवार, दिपक लाकडे यांनी केली.