लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या नागपूर येथील विभागीय कार्यालयातर्फे पहिल्यादांच नागपुरात आंबा, मिलेट व धान्य अशा एकत्रित महोत्सवाचे आयोजन १६ ते १९ मे दरम्यान करण्यात आले आहे. शहरातील उत्तर अंबाझरी मार्गावरील कुसुमताई वानखेडे भवन येथे आयोजित या महोत्सवाचे कृषी पणन महामंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे संचालक अजय कडू यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
संयुक्त राष्ट्रसंघाने सन २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष घोषित केले आहे. या अनुषंगाने महराष्ट्र श्री अन्न अभियान सुरु करण्यात आले आहे. तृणधान्यांचे पोषण आहारात असलेले महत्व विचारात घेऊन जास्तीत जास्त लोकांच्या आहारातील तृणधान्याचा वापर वाढविणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत तृणधान्यापासून मूल्यवर्धित उत्पादने तयार करणारे मोठ्या प्रमाणात नवउद्योजक तयार झाले आहेत. यामध्ये वैयक्तिक उत्पादक, शेतकरी बचत गट, सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, स्टार्टअप कंपन्या यांचा समावेश आहे. सदर उत्पादकांच्या उत्पादनांचा प्रचार, ग्राहकांमध्ये जागरुकता, थेट खरेदी व मार्केट लिकेनेस तयार करणे आवश्यक आहे. या हेतुने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात ज्वारी, नाचणी, बाजरी, सावा, वरई, आमा, भगर, राळा यासह उत्पादीत माल उपलब्ध राहणार असल्याची माहिती अजय कडू यांनी दिली. यावेळी नागपूर विभागीय कार्यालयाचे व्यवस्थापक राजेश सरोते उपस्थित होते.
महोत्सवात एक कोटींचा आंबा महोत्सवामध्ये एक कोटी रुपयांचा आंबा येण्याची अपेक्षा आहे. यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यातील हापूस तसेच राज्यातील इतर भागातील केशर आंबा उत्पादकांचा सामावेश असणार आहे. तसेच महाराष्ट्रातल्या सर्व भागातून मिलेट व धान्य उत्पादक त्याच्या शेतमालाची कोणत्याही मध्यस्थाविना थेट ग्राहकांना विक्री करणार आहे.