लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अक्षय्य तृतीयेनंतर कडक उन्हात सर्व प्रकारच्या आंब्याची आवक आणि विक्री वाढत असल्याचा अनुभव आहे. लॉकडाऊनच्या काळात घरोघरी आंब्याच्या रसावर भर असल्याने आवकीच्या तुलनेत विक्री वाढली आहे. कळमन्यात शनिवारी ३०० पेक्षा जास्त गाड्यांची (एक गाडी ५ ते १० टन) आवक झाली. तेवढीच विक्री झाल्याची माहिती विके्रत्यांनी दिली.कळमना फळ बाजार अडतिया असोसिएशनचे माजी अध्यक्ष आनंद डोंगरे म्हणाले, फळ बाजार आठवड्यात सहा दिवसांऐवजी आता मंगळवार, गुरुवार, शनिवार असे तीन दिवस सुरू आहे. त्यानुसार अन्य राज्यातील शेतकरी आणि व्यापारी कळमन्यात माल आणत आहेत. गुरुवारी ३०० आणि शनिवारी ३०० ट्रकची आवक झाली. जेवढी आवक आहे, त्यापेक्षा जास्त मागणी आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा मागणी जास्त असल्याचे दिसून येत आहे. लॉकडाऊनमध्ये अनेकजण घरी असून त्या सर्वांचा आंब्याच्या रसावर भर आहे. त्याच कारणाने विक्री वाढली आहे. सर्वाधिक म्हणजे जवळपास ९० टक्के आवक आंध्र प्रदेशातील बैगनफल्ली आंब्याची असून गुरुवारी ३० रुपये किलो भाव होते. मागणी वाढल्यानंतर शनिवारी भाव ३८ रुपयांवर गेले आहेत. यंदा नागपूर जिल्ह्यातील लंगडा आणि दसेरी आंब्याची आवक नाही. आंध्र प्रदेशातील हापूस आंब्याचे दर ८० रुपये किलो असून १०० ते २०० क्रेटची आवक आहे. या आंब्याला मागणी कमी आहे. याशिवाय तोताफल्ली आंब्याचे दोन ट्रक येत असून भाव १५ ते २० रुपये किलो आहे. यावर्षी कोकणातील हापूस आंबा कळमन्यात विक्रीला आलाच नाही, असे डोंगरे यांनी सांगितले. कळमन्यात मार्चअखेरपासून आंब्याची आवक सुरू होते. पण यावर्षी आवक उशिरा म्हणजे एप्रिलमध्ये सुरू झाली. त्यावेळी कोरोनामुळे आंब्याला मागणी नव्हती.ज्यूस सेंटर व स्टॉल बंद, पण मागणीत वाढलॉकडाऊनच्या काळात रेस्टॉरंट, ज्यूस सेंटर आणि रस्त्यावरील ज्यूस स्टॉल बंद असताना त्यांच्याकडून मागणी शून्य आहे. पण यंदा घरगुती ग्राहकांकडून मागणी वाढल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. लॉकडॉऊनमध्ये आंब्याच्या पक्वान्नावर सर्वांचा भर असल्याने मागणी वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. रेस्टॉरंट आणि हॉटेल संचालकांनी बंद प्रतिष्ठानासमोर आंब्यासह अन्य फळ विक्रीचे स्टॉल लावले आहे. आर्थिक मिळकतीचा त्यांचा प्रयत्न आहे. याशिवाय कॉलनी आणि सोसायट्यांमध्ये महिला आणि युवकांनी आंबा विक्रीचे स्टॉल लावल्याचे शहरात दिसून येत आहे. नागपुरात बैगनफल्ली आंब्याचे भाव ७० ते ८० रुपये किलो आहेत. आवक वाढल्यानंतर भाव कमी होणार नाही, असे विक्रेते म्हणाले. जून महिन्यात लखनौचा दसेरी आंबा आणि अन्य राज्यातील आंब्याची आवक होणार आहे.नागपूर जिल्ह्यात आंबा ५ टक्के!एक वर्षाआड आंब्याचे पीक येत असल्याचा अनुभव यावर्षी नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आला आहे. गेल्यावर्षी लंगडा आणि दसेरी आंब्याचे १०० टक्के उत्पादन झाले होते. पण यंदा ५ टक्केच उत्पादन आले आहे. त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. यावर्षी लंगडा आणि दसेरी आंब्याची आवकच नाही. पुढील वर्षी उत्पादन येण्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली.
बाजारात सुविधांचा अभावकळमना बाजारात फळांची आवक वाढली असून ग्राहक, विक्रेते आणि अडतिये शारीरिक अंतर राखत नाहीत. त्यामुळे या बाजारात कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकारी कार्यालयात बसून बाजाराचे संचालन करताना दिसून येत आहे. बाजारात येऊन फळांचा लिलाव आणि विक्रीवर नियंत्रण करण्यावर त्यांचा भर नाही. याशिवाय स्वच्छता आणि अत्यावश्यक सोईसुविधांचा अभाव आहे. बाजार समितीने गर्दी होत असल्याने बाजार तीन दिवस सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरही शारीरिक अंतर राखले जात नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. याकडे समितीच्या अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी अडतिया असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.