लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : बॅंक शाखांमध्ये खातेदारांना नाेटा माेजून देण्याची बतावणी करीत हातचलाखीने रक्कम लंपास करणाऱ्या अट्टल चाेरट्यास कामठी (जुनी) पाेलिसांनी पाठलाग करून अटक केली. त्याच्याकडून कार आणि १२ हजार रुपये राेख जप्त केले असून, ही कारवाई कामठी शहरातील वारीसपुरा भागात गुरुवारी (दि. २१) सायंकाळी ६ च्या सुमारास करण्यात आली. मोहम्मद तनवीर अक्रम अली (वय २८, रा. न्यू येरखेडा, ता. कामठी) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे.
अलीकडच्या काळात विविध बॅंक शाखांमध्ये खातेदारांना विश्वासात घेऊन त्यांना नाेटा माेजून देण्याची बतावणी करीत नाेटांच्या बंडलमधील काही नाेटा हातचलाखीने चाेरून नेण्याचे प्रमाण वाढले आहे. मोहम्मद तनवीर अक्रम अली हा असले प्रकार करीत असल्याची, तसेच ताे एमएच-३१/सीपी-८२८६ क्रमांकाच्या कारने नागपूरहून कामठीला येत असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली हाेती. त्यामुळे कामठी (जुनी) पाेलिसांनी कामठी शहरातील गरुड चाैकात नाकाबंदी करून त्याला अडविण्याचा प्रयत्न केला. पण पाेलिसांना पाहताच त्याने कारचा वेग वाढवून पळ काढला. त्यामुळे पाेलिसांनी त्याचा पाठलाग केला आणि त्याला वारीसपुरा येथे अडवून अटक केली.
त्याने गुन्ह्यांची कबुली दिली असून, त्याच्याकडून कार आणि १२ हजार रुपये राेख जप्त केले आहेत, अशी माहिती ठाणेदार विजय मालचे यांनी दिली. याप्रकरणी कामठी (जुनी) पाेलिसांनी भादंवि ३७९ अन्वये गुन्हा नाेंदवून पाेलिसांनी तपास सुरू केला आहे. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक युनूस शेख यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली.
...
विविध पाेलीस ठाण्यात गुन्ह्यांची नाेंद
मोहम्मद तनवीर अक्रम अली हा हातचलाखीने नाेटा लंपास करण्यात पटाईत असल्याची माहिती पाेलिसांनी दिली. त्याने आजवर कामठी (नवीन), कामठी (जुनी) व रामटेक पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील बॅंक ऑफ इंडिया, युकाे बॅंकेच्या शाखांमध्ये बॅंक खातेदारांना विश्वासात घेत गंडा घातला आहे. त्यामुळे त्याच्याविराेधात या तिन्ही पाेलीस ठाण्यांमध्ये गुन्ह्यांची नाेंद असल्याची माहिती ठाणेदार विजय मालचे यांनी दिली असून, त्याच्याकडून अन्य घटना व साथीदारांची नावे उघड हाेण्याची शक्यताही आहे. त्याला सध्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.