नागपूर : वर्षभरापासून हिंसेने पेटलेल्या मणिपुरातील विद्यार्थ्यांना फरपट सहन करावी लागते आहे. घरदारासकट शैक्षणिक साहित्यही जळाले. शाळा काॅलेजेस बंद पडली आणि अर्ध्यातच शिक्षणही थांबले. जीव मुठीत घेऊन बाहेर पडलेल्या या विद्यार्थ्यांची विविध राज्यातील वेगवेगळ्या विद्यापीठाच्या दारी भटकंती सुरू आहे. नागपुरात आलेल्या अशाच १० विद्यार्थ्यांना राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठाने शिक्षणाचा आधार दिला.
२०२३-२४ या सत्रासाठी विद्यापीठांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. अशात सत्राच्या मध्येच प्रवेश देणे अडचणीचे असते. त्यातही हिंसाचारात या बहुतेक विद्यार्थ्यांची शैक्षणिक कागदपत्र जळाली आहेत. या स्थितीत पुढे शिक्षण कसे घ्यावे, ही माेठी समस्या या विद्यार्थ्यांसमाेर उभी ठाकली आहे. वेगवेगळ्या राज्यात भटकंती करणाऱ्यांमध्ये बहुसंख्य विद्यार्थी कुकी समुदायाचे आहेत. या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मानवीय दृष्टीकाेणातून व्यापक स्तरावर विविध संघटनांकडून प्रयत्न सुरू आहेत. या विद्यार्थ्यांना नागपूर विद्यापीठाने केवळ प्रवेशच दिला नाही तर त्यांच्या शिक्षणाची जबाबदारीही स्वीकारली आहे. त्यांना वसतीगृहसुद्धा उपलब्ध करण्याचा विश्वास कुलगुरू डाॅ. चाैधरी यांनी दिला आहे.
सीनेट सदस्य डाॅ. श्रीकांत भाेवते यांनी विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. या संपूर्ण प्रक्रियेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर टीचर्स ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी, ओबीसी महासंघाचे अध्यक्ष नितीन चौधरी, माजी सिनेट सदस्य प्रशांत डेकाटे यांनी प्रयत्न केले. प्र कुलगुरू संजय दुधे आणि कुलसचिव राजू हीवसे, विद्यार्थी विकास परिषदेचे संचालक डॉ. मंगेश पाठक आणि मानव्यशास्त्र विभागाचे डीन डॉ. श्याम कोरेटी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
कुलगुरुंनी घेतली दखल
विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न करणाऱ्या डॉ. प्रशांत तांबे डॉ. अजय चौधरी प्रा. अमरीश ठाकरे यांनी सीनेट सदस्य डॉ. श्रीकांत भोवते यांच्या नेतृत्वात संपर्कात असलेल्या काही विद्यार्थ्यांना आपल्या विद्यापीठात निशुल्क प्रवेश द्यावा आणि विद्यापीठ वस्तीगृह त्यांची निःशुल्क व्यवस्था करावी यासाठी कुलगुरू डाॅ. सुभाष चौधरी यांना निवेदन देऊन हे प्रकरण सातत्याने लावून धरले. प्रवेश प्रक्रिया बंद झालेली असताना मणिपूर येथिल परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून कुलगुरू यांनी विशेष दखल घेत तातडीने राज्य सरकार व संबंधित प्रशासनाशी चर्चा करून याबाबतीत अडचणी दूर करून घेतल्या. पाच ते सहा बैठका घेत कुलगुरुंनी मॅनेजमेंट काॅन्सिलच्या बैठकीत प्रस्ताव ठेवला. सर्व सदस्यांनी या भूमिकेचे स्वागत केले आणि विद्यापीठ कायद्यात बदल करून विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्ग माेकळा केला.
स्वातंत्र्यापूर्वी अनेक स्वातंत्र्य सैनिकांना हैदराबादमध्ये शिक्षण नाकारले हाेते. अशावेळी वीरांना नागपूर विद्यापीठाने आधार देत त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यात मदत केली. मणिपूरच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देत मानवतेची परंपरा विद्यापीठाने कायम राखली आहे. या विद्यार्थ्यांना वसतीगृहाचाही आधार मिळावा म्हणून आमचे प्रयत्न असून कुलगुरू ताे मार्गही सुकर करतील, असा विश्वास आहे.- डाॅ. श्रीकांत भाेवते, सीनेट सदस्य, नागपूर विद्यापीठ