Manipur Violence : मणिपूरच्या जिरीबाम जिल्ह्यात CRPF आणि राज्य पोलिसांच्या संयुक्त पथकावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. घात लावून बसलेल्या अज्ञात सशस्त्र हल्लेखोरांनी आज(14 जुलै) सकाळी 9.40 च्या सुमारास अचानक केलेल्या या हल्ल्यात CRPF चा एक जवान शहीद झाला आहे, तर तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, 13 जुलै रोजी जिरीबाम जिल्ह्यातील मोनबुंग गावाजवळ गोळीबार झाला होता. त्यामुळे सीआरपीएफ आणि जिरीबाम जिल्हा पोलिसांचे पथक या परिसरात सर्च ऑपरेशन राबवत होते. या दरम्यान, घात लावून बसलेल्या हल्लेखोरांनी या पथकावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात सुमारे तीन जवान जखमी झाले, तर गोळी लागल्याने एका सीआरपीएफ जवानाचा मृत्यू झाला. अजय कुमार झा (४३) असे शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानाचे नाव असून, ते बिहारचा रहिवासी आहे.
एप्रिलमध्ये दोन समुदायांमध्ये हिंसाचार मणिपूरमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून हिंसाचार पसरलेला आहे. कुकी आणि मेईतेई समुदायांमधील संघर्षाने संपूर्ण राज्य पेटून निघाले आहे. गेल्या वर्षी 3 मे रोजी मणिपूरमध्ये जातीय हिंसाचार सुरू झाल्यापासून 180 हून अधिक लोक मारले गेले आहेत. मणिपूरच्या लोकसंख्येच्या सुमारे 53 टक्के मेईतेई असून, ते इम्फाळ खोऱ्यात राहतात. तसेच, नागा आणि कुकी आदिवासींची संख्या 40 टक्के असून, ते डोंगराळ जिल्ह्यांमध्ये राहतात.