लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कुख्यात मनीष श्रीवासचा खून केल्यानंतर त्याच्या प्रेताचे तुकडे एमपी येथील कुरईमध्ये जिथे फेकले होते, त्या स्थळाचा पत्ता पोलिसांना लागला आहे. परंतु, प्रेताचे अवशेष मिळाले नसल्याने पाेलिसांच्या चिंतेत वाढ झाली आहे. दरम्यान पोलिसांनी प्रेताचे तुकडे करण्यास वापरलेली तलवार, तुकडे फेकण्यासाठी वापरात आणलेली सॅण्ट्रो कार, रणजित सफेलकरची स्कॉर्पियो व कालू हाटेची फॉर्च्युनर सह ५७ लाख रुपये किमतीचे वाहन जप्त केले आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे गुन्हे शाखेने ९ वर्षानंतर मनीष श्रीवासच्या खुनाचा गुंता सोडवत कालू हाटे, त्याचा भाऊ शरद हाटे व सफेलकरचा बॉडीगार्ड हेमंत गोरखा याला अटक केली आहे. तिघेही ३१ मार्चपर्यंत पोलिसांच्या ताब्यात आहेत. रणजित सफेलकरने हाटे बंधू, छोटू बागडे व अन्य साथीदारांच्या मदतीने मनीषचा खून केला होता. त्यांनी मनीषला शारीरिक सुखाचे आमिष दाखवून पवनगाव (धारगाव) येथे शेतात बोलावले होते. तेथे एका घरात त्याचा खून केला आणि प्रेताचे दुसऱ्या घरात नेऊन तुकडे केले. हे तुकडे पोत्यात भरून सॅण्ट्रो कारने एमपी येथील कुरई येथे गेले. तेथील जंगलात ते तुकडे फेकून प्रेताची विल्हेवाट लावली होती. प्रारंभी मनीषचे प्रेत जाळण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, हाटे बंधूंची कठोरतेने विचारपूस केल्यावर प्रेताचे तुकडे कुरईच्या जंगलात फेकण्यात आल्याचा खुलासा झाला.
हाटे बंधूंनी पोलिसांना तेथे स्थळ दाखवले आहे. त्या स्थळावर रस्ता निर्माणासाठी लागणारी माती मोठ्या प्रमाणात टाकण्यात आली आहे. त्यामुळे, प्रेताचे तुकडे पोलिसांना सापडले नाही. पोलिसांनी खुनासाठी वापरलेले शस्त्र व ५७ लाख रुपये किमतीचे पाच वाहन जप्त केले आहे. कालूने दोन तलवारी एकाच ठिकाणी लपवून ठेवल्या होत्या. त्या तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. कुरईला जाताना सॅण्ट्रो कारमध्ये बिघाड आला होता. ती कार कुठे दुरुस्त करण्यात आली, त्याची माहितीही मिळाली आहे. कारमध्ये कालू व हेमंत गोरखा होते. दोघेही सफेलकरचे विश्वासू होते. पोलिसांचे लक्ष्य आता सफेलकरवर केंद्रित झाले आहे. तो सापडल्यावरच मनीष श्रीवास व एकनाथ निमगडे हत्यांकांडाची सत्यता प्रकाशात येईल. सफेलकर शेजारील राज्यांमध्ये लपला असल्याचे स्पष्ट होत आहे. तेथे मोठ्या संख्येने त्याचे समर्थक आहेत. पोलिसांनी त्या समर्थकांवरही सापळा टाकण्याची तयारी सुरू केली आहे.