लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे रुग्ण धाव घेत असल्याने तेथील वैद्यकीय सुविधांवर ताण आला आहे. मेडिकलमध्ये रुग्णालय प्रशासकाचे वेगळे पद नाही. हजार खाटांच्या नियोजनासाठी मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय यंत्रणेची आवश्यकता आहे. त्यामुळे मनपाने मेडिकलला अतिरिक्त मनुष्यबळ पुरवावे, अशी मागणी माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी केली आहे.
मेडिकलमध्ये अत्यवस्थ कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, त्यांना नॉन फिजिशिअन्स सेवा देत आहेत. मेडिकलमध्ये बाहेरून वैद्यकीय तज्ज्ञ पुरविण्याची आवश्यकता आहे. जर तज्ज्ञ उपलब्ध असतील, तर ओपीडीत अनेक रुग्णांवर तातडीने उपचार होऊ शकतात. त्यादृष्टीने नियोजन झाले पाहिजे, असे मुळक म्हणाले. मेडिकलमध्ये रुग्णांसोबत मोठ्या प्रमाणावर नातेवाईक येतात. त्यांच्यासाठी प्रतीक्षा कक्ष नसल्याने त्यांची अडचण होते. त्यादृष्टीनेदेखील प्रशासनाने नियोजन करावे. कोरोना वॉर्डात सेवा देणारे कर्मचारीदेखील बाधित होत आहेत. एकाच व्यक्तीला सातत्याने तेथे ठेवणे अयोग्य असल्याने त्यांच्या ड्युटीचे स्थान नियमितपणे बदलले गेले पाहिजे. सोबतच वय जास्त असलेले व विविध आजार असलेल्या कर्मचाऱ्यांनादेखील कोरोना वॉर्डात ड्युटी देऊ नये, अशी भूमिका मुळक यांनी मांडली. कोरोनादरम्यान सेवा देणाऱ्या पॅरामेडिकल स्टाफला विशेष भत्ता देण्यात यावा, अशी मागणीदेखील त्यांनी केली.