नागपूर : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळत आहे. परंतु त्यातुलनेत राज्याकडून लसीचा कमी साठा उपलब्ध झाल्याने महानगरपालिकेकडे दोन दिवस पुरतील एवढेच डोज शिल्लक होते. ‘लोकमत’ने हे प्रकरण उघडकीस आणताच मनपामध्ये आज हालचालींना वेग आला. नागपूर ग्रामीणमधून ‘कोविशिल्ड’चे ५ हजार तर वर्धा जिल्ह्याकडून ‘कोव्हॅक्सिन’चे ७ हजार असे एकूण १२ हजार डोज उसनवारी तत्त्वावर मिळाले. ही तात्पुरती व्यवस्था असली तरी राज्याकडून वेळेवर मोठा साठा उपलब्ध न झाल्यास लसीकरण अडचणीत येण्याची शक्यता आहे.
६० वर्षांवरील व ४५ वर्षांवरील गंभीर आजार असलेल्या लाभार्थ्यांच्या लसीकरणाला १ मार्चपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवसापासून ज्येष्ठांची सर्वच केंद्रांवर गर्दी होऊ लागली. यामुळे नागपूर जिल्ह्याला मोठ्या संख्येतील डोजची अपेक्षा होती. परंतु तिसऱ्या टप्प्यात ४९,५०० डोज मिळाले. यातच केंद्रांची संख्या वाढवून ५५ करण्यात आली. शिवाय, दोन पाळीत लसीकरण सुरू करण्यात आले. यामुळे केंद्रावर गर्दी कमी झाली असली तरी दिवसाकाठी ज्येष्ठांचे लसीकरण ६ हजारांवर पोहचले. मागील आठ दिवसात ६० वर्षांवरील १४,१३८ ज्येष्ठांनी तर ४५ वर्षांवरील ५,६६७ असे एकूण १९,८०५ लाभार्थ्यांनी लस घेतली. ‘हेल्थ वर्कर, ‘फ्रंट लाईन वर्कर’ यांना पहिला व दुसरा डोज देणे सुरू आहे. मागील तीन दिवसापासून प्रतिदिवस ९ ते १० हजार डोज लावले जात आहेत. परिणामी, मनपाकडे लसीचा जेमतेम साठा उरला. १८ ते १९ हजार डोज शिल्लक असल्याने पुढील दोन दिवसात तुटवडा पडण्याची शक्यता होती. याकडे ‘लोकमत’ने वृत्तातून लक्ष वेधले. परिणामी, आज वर्धा जिल्ह्यातून कोव्हॅक्सिनचे ७ हजार तर नागपूर ग्रामीणकडून ‘कोविशिल्ड’चे ५ हजार डोज उपलब्ध झाले.
- दोन दिवसात २ लाख ७५ हजार डोज येण्याची शक्यता
उपसंचालक आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवसात राज्याच्या आरोग्य विभागाकडून ‘कोविशिल्ड’ लसीचे २ लाख ७५ हजार डोज येण्याची शक्यता आहे. परंतु हे डोज नागपूर विभागासाठी असतील. यात सहा जिल्ह्यामधून नागपूर जिल्ह्याच्या वाटेला किती येईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सूत्रानुसार, या डोजचे वितरण उपसंचालक आरोग्य विभागाच्या कार्यालयाला करायचे आहे. यामुळे नागपूर जिल्ह्याला गरजेनुसार डोज दिले जाणार असल्याची माहिती आहे.
-लसीकरणात खंड पडणार नाही
मनपाकडे कोविशिल्डचे २० हजार डोज उपलब्ध आहेत. लवकरच राज्याकडून मोठ्या संख्येत डोज उपलब्ध होणार आहे. यामुळे लसीचा तुटवडा पडणार नाही. कोरोना लसीकरणात कुठेही खंड पडू दिला जाणार नाही.
- डॉ. संजय चिलकर
आरोग्य अधिकारी, मनपा