राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून पुतळ्यांची निगा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहरामध्ये अस्तित्वात असलेल्या पुतळ्यांचे निर्माण व व्यवस्थान व्हावे, याकरिता आता महापालिकेला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची साथ मिळाली आहे. विद्यापीठाशी संलग्न १५१ महाविद्यालयांमधील राष्ट्रीय सेवा योजनेच्या समूह संघाद्वारे आता पुतळे दत्तक घेऊन त्याची देखभाल करणार आहे.
नागपूर शहरामध्ये विविध महापुरुषांचे पुतळे अस्तित्वात आहेत. मात्र या पुतळ्यांचे व्यवस्थापन योग्य प्रकारे होत नाही. जयंती व पुण्यतिथीच्या दिवसाला महापुरुषांची आठवण येते. महापौर दयाशंकर तिवारी यांच्या संकल्पनेतून मनपा व विद्यापीठ यांच्या संयुक्त माध्यमातून नाविन्यपूर्ण योजना आखण्यात आली आहे. राष्ट्रीय सेवा योजनेतील प्रत्येक विद्यालयातील स्वयंसेवक एक पुतळा दत्तक घेईल. त्याचे व्यवस्थापन बघतील. पुतळ्यांची साफसफाई मनपाच्या माध्यमातून केली जाईल. या कार्यामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये सेवा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मनपातर्फे प्रमाणपत्र दिले जाईल.