कंत्राटदार व वित्त अधिकारी हमरीतुमरीवर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेत गुरुवारी सायंकाळच्या सुमारास कंत्राटदार व मुख्य लेखा व वित्त अधिकारी बिलावरून हमरीतुमरीवर आल्याने मुख्यालयात चांगलीच खळबळ उडाली होती. कमिशनवरून हा राडा झाल्याची माहिती आहे.
विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वित्त व लेखा विभागात टक्केवारी शिवाय कंत्राटदारांचे बिल मंजूर होत नाही. यामुळे लहानसहान काम करणारे कंत्राटदार त्रस्त आहेत. चार-पाच लाखाच्या बिलासाठी चकरा माराव्या लागतात. मागील काही महिन्यापासून चार लाखाच्या थकीत बिलासाठी कंत्राटदार नागसेन हिरेखन वित्त विभागात चकरा मारत आहे. गुरुवारी सायंकाळी पुन्हा ते वित्त विभागात आले. मुख्य लेखा व वित्त अधिकारी विजय कोल्हे यांच्याकडे यासंदर्भात विचारणा केली. परंतु त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यावरून वाद झाला. प्रकरण हमरीतुमरीवर आले. गोंधळामुळे वित्त विभागातील कर्मचारी गोळा झाले होते. वाद विकोपाला गेल्याने दोघेही तक्रार देण्यासाठी सदर पोलिस स्टेशनला पोहचले. परंतु बदनामीच्या भितीने वित्त अधिकाऱ्यांनी नमते घेत समेट घडवून परतल्याची माहिती आहे. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी विजय कोल्हे यांच्याशी फोनवर संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.