चौकशी समिती गठित : निवृत्तांकडून पासवर्डचा वापर
लाेकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेत कोट्यवधींचा कर कमी करून देणारे रॅकेट सक्रिय आहे. निवृत्त कर्मचारी अधिकाऱ्यांच्या यूजर आयडी व पासवर्डचा वापर करत असल्याची धक्कादायक बाब पुढे आल्यानंतर महापौर दयाशंकर तिवारी यांनी महासभेत गुरुवारी यासंदर्भात तीन सदस्यीय चौकशी समिती गठित केली आहे.
सर्वसाधारण सभेत लक्षवेधीच्या माध्यमातून नगरसेवक प्रवीण दटके यांनी या रॅकेटची माहिती दिली. याप्रकरणी सायबर सेलला तक्रार करणाऱ्या अधिकाऱ्यालाच निलंबित करण्यात आल्याचा दावाही दटके यांनी यावेळी केला. रॅकेट सक्रिय झाल्यामुळे याचा मनपाच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. या प्रकरणाचा उलगडा व्हावा याकरिता चौकशी समिती गठित करण्याची मागणी त्यांनी केली. याप्रकरणी गांधीबाग झोनचे अधिकारी संजय खडगी यांंनी तक्रार केली. परंतु प्रशासनाने त्यांनाच निलंबित केले. दीड महिन्यापूर्वी या प्रकरणाची चौकशीची मागणी आयुक्तांकडे केली होती. परंतु, आयुक्त राधाकृषन बी. यांनी ही बाब प्रशासकीय असल्याचे सांगत कुठल्याही चौकशी समितीची गरज नसल्याचे स्पष्ट केले. मात्र दटके यांनी समिती नेमण्याची मागणी लावून धरली. अखेर अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, सहायक आयुक्त व कर समिती सभापती यांची समिती गठित केली. ही समिती चौकशी करून पुढील सभागृहात अहवाल ठेवणार आहे.