नागपूर : महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी करून कामात सुसूत्रता आणण्याच्या उद्देशाने मनपातील प्रत्येक कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या कामाचे आॅडिट करून त्याचा डाटा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहे, अशी माहिती मनपा स्थायी समितीचे अध्यक्ष नरेंद्र ऊर्फ बाल्या बोरकर यांनी पत्रपरिषदेत दिली. मनपा स्थायी समितीची बैठक गुरुवारी पार पडली. बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. बोरकर यांनी सांगितले की, महापालिकेतील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण आहे, तर काही कर्मचारी व अधिकाऱ्यांकडे काहीच काम नाही, ही बाब निदर्शनास आल्याने प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांचा कामासंबंधीचा डाटा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामध्ये मनपात एकूण किती अधिकारी व कर्मचारी आहेत. त्यापैकी किती नियमित आहेत. त्यांच्याकडे कोणती कामे आहेत. निलंबित किती, चौकशी बसलेले किती, अद्याप चौकशी झालेली नाही असे अधिकारी व कर्मचारी किती आहेत. प्रत्येकांकडे कुठले काम आहे. या सर्वांची माहिती तयार करण्यास सांगण्यात आले आहे. ही माहिती एकत्र झाल्यावर कामाची विभागणी करण्यात सुलभता येईल व सुसूत्रता निर्माण होईल, असेही बोरकर यांनी स्पष्ट केले. कामामध्ये सुसूत्रता आणण्याच्या उद्देशाने हा डाटा तयार करण्यात येत असल्याचे बोरकर सांगत असले तरी, कामचुकार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर चाप ठेवण्यासाठीच डाटा तयार केला जात असल्याची मनपात चर्चा आहे. (प्रतिनिधी)रस्ते दुरुस्तीच्या कामांना प्रशासकीय मंजुरी शहरातील रस्त्यांची दुरुस्ती व सुस्थिती तसेच डांबरीकरणाच्या कामासाठी ३ कोटी ४९ लाख ७७ हजार २९० रुपयांचे डांबर खरेदी करणे, लेबर पुरवठ्यासाठी ३४ लाख ९८ हजार ३३७ रुपये आणि डांबर वाहतुकीसाठी ३९ लाख ५५ हजार ७७५ रुपयाच्या प्रशासकीय कामाला मंजुरी प्रदान करण्यात आली. याशिवाय सोनेगाव तलावात ओव्हरफ्लो पाईप टाकण्याच्या कामासाठी प्राप्त एकमेव निविदेस मंजुरी प्रदान करण्यात आली. याशिवाय प्रभागातील विविध रस्त्यांच्या कामांनाही प्रशासकीय मंजुरी प्रदान करण्यात आली. अतिक्रमण विभागावरील ताण कमी होणारअतिक्रमण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना बरीच अतिरिक्त कामे करावी लागतात. त्यामुळे त्यांच्यावरील कामाचा ताण कमी करण्याच्या उद्देशाने अतिक्रमण कारवाईचे निर्देश झोनअंतर्गत देण्यात यावे की केंद्रीय कार्यालयातून द्यावे, याबाबत माहिती मागविण्यात आल्याचे नरेंद्र ऊर्फ बाल्या बोरकर यांनी सांगितले.
मनपातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कामाचे आॅडिट
By admin | Published: August 01, 2014 1:10 AM