- आचार्यश्री महाश्रमण : हेडगेवार स्मृती मंदिरला दिली भेट
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मनुष्य जन्म मिळणे कठीण आहे आणि त्यानंतर मुक्तीची आकांक्षा आणि त्यातही संतांचे सानिध्य अत्यंत कठीण आहे. हे जीवन सुलभतेने मिळाले आहे आणि या जीवनाला यशस्वी करणे, आपले कर्तव्य आहे. प्रारब्धातील पुरुषार्थाने सुलभता मिळाली आहे तर यशस्वी कसे बनावे, या प्रश्नाचे उत्तर संयम, सेवा, साहस आणि समतेत दडले असल्याची भावना अहिंसा यात्रेचे प्रणेता तेरापंथ समाजाचे आचार्यश्री महाश्रमणजी यांनी व्यक्त केली.
रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिरात आचार्यश्री यांनी आज मार्गदर्शन केले. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत उपस्थित होते. आपल्याला संयम साधना करावी लागले. गृहस्थ जीवनातही ही साधना महत्त्वाची आहे. आपले इंद्रिय, मन, वाणीवर संयम असावे. कोणी टीका करत असेल तर चांगल्या कार्याने त्याचे उत्तर द्या. जो व्यक्ती दुसऱ्यांसाठी कार्य करतो, तो कार्यकर्ता असतो. संघटनेत शक्ती आहे. संघटनेप्रति निष्ठावान राहा आणि संघटनेची अवहेलना करू नका, असे आचार्यश्री यावेळी म्हणाले.
आयुष्यात साधारण गोष्टींपासून भयभीत होऊ नका, दृढ साहस जपा. समतेलाच धर्म म्हटले गेले आहे. वर्तमान जीवन म्हणजे सर्वस्व नव्हे. आगामी आयुष्यही उत्तम व्हावे, यासाठी प्रयत्न करा. आत्मचेतनेच्या निर्मलतेसाठीही समता महत्त्वाची असते, असे आचार्यश्री म्हणाले. तत्पूर्वी, मुनिश्री कुमार श्रमणजी यांनी तेरापंथ समाजाची विस्तृत माहिती दिली. श्री जैन श्वेतांबर तेरापंथाची स्थापना आचार्यश्री भिक्षू यांनी २६० वर्षांपूर्वी केली होती. हा समाज एक आचार्य, एक विधानाच्या परंपरेवर आधारित आहे. आचार्यश्री महाश्रमणजी ११वे आचार्यश्री आहेत. त्यांनी अहिंसा यात्रेची माहितीही यावेळी दिली.
-------------
अंतर्मनात सुख शोधावे - भागवत
तेरापंथ आचार्यांशी भेट घेणे, ही एक परंपराच झाली आहे. समाजाच्या भौतिक जीवनाचा विचार संघ करतो. देशात भौतिक विचारसुद्धा आध्यात्मिक आधारावरच केले जाते. सुख बाहेर नाही तर अंतर्मनात आहे, हे समजणारा भारत एकमात्र देश असल्याची भावना यावेळी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली. चराचर विश्व करारावर नव्हे तर संबंधाच्या आधारावर चालते ही शिकवण आपल्या पूर्वजांनी दिली आहे. दर्शन, पूजन, धर्म भिन्न असू शकतात. परंतु, आपली संस्कृती एक आहे. तेरापंथ आणि संघाच्या अनुशासनात अनेक समानता असल्याचे भागवत म्हणाले. यावेळी भागवत यांनी आचार्यश्री यांना स्मृतिचिन्ह देऊन स्वागत केले.
..........