लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रीय प्रवासी स्वयंसेवकाच्या महाशिबिराचे अमरावती येथे आयोजन करण्यात आले आहे. १८ ते २० जानेवारी या कालावधीत आयोजित या शिबिरात पाच हजारांहून अधिक स्वयंसेवक सहभागी होणार आहेत. या शिबिरात सरसंघचालक डॉ.मोहन भागवत हेदेखील उपस्थित राहणार असून बौद्धिक सत्रादरम्यान देशातील सध्याच्या सामाजिक परिस्थितीवर मंथन करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.अमरावती येथील बडनेरा मार्गावर राष्ट्रीय प्रवासी स्वयंसेवकांचे विदर्भ प्रांत कार्यकर्ता शिबिर आयोजित करण्यात आले आहे. २७ एकरांच्या विस्तीर्ण जागेत हे शिबिर होणार असून अंबानगरीची सांस्कृतिक व ऐतिहासिक परंपराच येथे अनुभवयाला मिळणार आहे.या परिसराला अंबानगरी असेच नाव देण्यात आले आहे. सुमारे ६०० तंबूंमध्ये स्वयंसेवकांची व्यवस्था करण्यात येणार आहे.या शिबिरामध्ये सरसंघचालकांसमवेत सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्यासह प्रत्येक क्षेत्रातील प्रांत प्रचारक, प्रांत संघचालकदेखील उपस्थित राहतील. शिबिरामधील विविध बौद्धिक सत्र व बैठकांदरम्यान देशातील विविध वर्तमान मुद्दे, संघटनाविस्तार, राजकीय परिस्थिती यावर चर्चा होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अमरावती जिल्ह्याची परंपरा मांडणारया शिबिरात जिल्हानिहाय एकूण पाच नगरांची रचना करण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्रत्येक नगराला अमरावती जिल्ह्यातील ऐतिहासिक महात्म्य असलेल्या स्थळांचीच नावे देण्यात आली आहे. यात रिद्धपूरनगर, कौंडण्यपूरनगर, ऋणमोचननगर, मुक्तागिरीनगर, गुरुकुंजनगर यांचा समावेश आहे. शिवाय शिबिराच्या प्रवेशद्वारी अमरावतीची ओळख असलेले अंबागेट साकारण्यात येणार आहे.