योगेश पांडे ल्ल नागपूरदिल्लीतील ‘जेएनयू’मध्ये (जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी) तथाकथित राष्ट्रद्रोही कृत्य झाल्याच्या प्रकरणावरून देशातील राजकीय वातावरण तापले आहे. या मुद्यावर केंद्रातील बहुतांश मंत्र्यांकडून मौन धारण करण्यात आल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. रोहित वेमुला प्रकरणात हात पोळल्यानंतर आता या प्रकरणात सावध पावले टाकण्याचे निर्देश राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडूनच देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सामाजिक समरसतेच्या संघाच्या उपक्रमाला या प्रकरणांमुळे फटका बसण्याची शक्यता लक्षात घेता हे पाऊल उचलण्यात आले आहे.एरवी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी आणि केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर, हे तिन्ही मंत्री कुठल्याही मुद्यावर रोखठोक प्रतिक्रिया देण्यासाठी जाणले जातात. परंतु या वादावर तिघांनीही संघभूमीत यामुळेच प्रतिक्रिया देण्यास नकार दिल्याचे दिसून आले. मागील वर्षी झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणी सभेत सामाजिक समरसतेचा ठराव संमत करण्यात आला होता. समाजातील सर्व स्तरांतील व विशेषत: बहुजन समाजातील नागरिकांना संघाकडे आकर्षित करून संघविस्तारासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार होता. यासाठी देशपातळीवर प्रयत्नदेखील सुरू झाले. परंतु बिहार निवडणुकांच्या ऐन अगोदर सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आरक्षणासंदर्भात दिलेल्या वक्तव्यामुळे देशात वादळ उठले व संघ तसेच केंद्र सरकार बहुजनविरोधी असल्याचे विरोधकांनी आरोप केले. यानंतर हैदराबाद येथील रोहित वेमुला या विद्यार्थ्याच्या आत्महत्येचे जोरदार राजकारण झाले.तीन दिवस, तिन्ही मंत्र्यांचा नकार४नागपुरात भारतीय शिक्षण मंडळातर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेला स्मृती इराणी, प्रकाश जावडेकर व नितीन गडकरी या तीन मंत्र्यांनी उपस्थिती लावली. इराणी व जावडेकर यांनी याअगोदर विविध वादग्रस्त प्रकरणात थेट प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर नितीन गडकरी हे नेहमी प्रामाणिक प्रतिक्रिया देण्यासाठी ओळखले जातात. या तिन्ही मंत्र्यांना ‘लोकमत’ प्रतिनिधीने लागोपाठ तीन दिवस ‘जेएनयू’ मुद्याबाबत विचारणा केली. परंतु तिघांनीही यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. याबाबत आता बोलणे योग्य होणार नाही, हे प्रकाश जावडेकरांचे उत्तर तर बरेच काही सांगून गेले.
‘संघ दक्ष’मुळे मंत्र्यांचे मौन
By admin | Published: February 16, 2016 4:04 AM