लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे कोरोनाचा धोका वाढल्याच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात सोमवारपासून निर्बंध अधिक कठोर करण्यात आले आहेत. त्यानुसार दुपारी ४ नंतर सुरू असलेल्या दुकानांवर मनपाच्या उपद्रव शोध पथकाव्दारे ठिकठिकाणी कारवाई करण्यात आली. या कारवाईला अनेक व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवून नाराजी व्यक्त केली. निर्बंध फक्त व्यापाऱ्यांनाच लागू आहेत का? असा सवाल केला.
सायंकाळी बाजार बंद राहणार असल्याने लोकांनी सकाळी बाजारात खरेदीसाठी गर्दी केली होती. मनपा प्रशासनाच्या निर्देशानुसार व्यापाऱ्यांनी दुपारी ४ वाजता दुकाने बंद केली. परंतु काही दुकानदार शटर खाली करून विक्री करीत होते. ठिकठिकाणी खाद्यपदार्थ विक्रेत्यांची विक्री सुरू होती. त्यावर पथकाने कारवाई केली. यावरून काही ठिकाणी वाद झाला. सायकांळी ५ पर्यंत जमावबंदी तर त्यानंतर संचारबंदीचे आदेश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी जारी केले आहेत. त्यानुसार नियमाचे पालन न करणाऱ्यांवर पथकामार्फत कारवाई केली जात आहे.