नागपूर : कोरोना प्रतिबंधक लसीकरणात अनेक खासगी रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांनी नावे दिली असतानाही प्रत्यक्ष लसीकरणातून त्यांना वगळण्यात आल्याचा ठपका ठेवत आयएमएने तातडीने त्यांचे लसीकरण करण्याचे निवेदन मंगळवारी मनपाचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांना भेटून दिले.
नागपूर जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील लसीकरणात कोरोनाच्या आणीबाणीच्या काळात आरोग्य सेवा देणाऱ्या फ्रंटलाईन हेल्थ वर्करला प्राधान्य देण्यात आले. त्यानुसार शासकीयसह खासगी रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांची यादी मागविण्यात आली होती. त्यानुसार ३६ हजार १४५ कर्मचाऱ्यांची नोंदणी झालीे. त्यांची नावे ‘को-विन’ अॅपमध्ये डाऊनलोड करून त्यांचे लसीकरण १६ जानेवारीपासून सुरू केले. परंतु लसीकरणाचा दुसरा टप्पा १५ फेब्रुवारीपासून सुरू झाल्यानंतरही अनेक खासगी हॉस्पिटलमधील डॉक्टरांसह इतर कर्मचारी लसीकरणापासून वंचित राहिले. याला घेऊन आयएमए नागपूर शाखेच्या अध्यक्ष डॉ. अर्चना कोठारी यांच्या नेतृत्वात डॉ. राजेश स्वर्णकार यांनी मनपाचे अतिरीक्त आयुक्त जलज शर्मा यांना भेटून निवेदन दिले. यावेळी शर्मा यांनी शिष्टमंडळाला सांगितले की, सध्या ‘अॅप’ बंद आहे. सुरू झाल्यास ज्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेले नाही त्यांची नावे ‘को-विन’मध्ये डाऊनलोड केले जाईल.