मंगेश व्यवहारे, नागपूर : सद्या राज्यभरात आरटीईच्या प्रवेशाच्या प्रक्रीया सुरू आहे. ज्या विद्यार्थ्यांचे आरटीईमध्ये नंबर लागले आहेत. त्यांचे पालक आरटीई पडताळणी समितीकडे कागदपत्र व अन्य माहितीची खात्री करून घेण्यासाठी जात आहे. परंतु पडताळणी समिती खाजगी ॲपवरून अंतराची माहिती घेत असल्याने, ते अंतर जास्त येत असल्याने अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहत आहे.
श्रीकृष्ण एनक्लेव्ह जयंतीनगरी-३ येथे राहणाऱ्या एका विद्यार्थ्याची भवन्स विद्या मंदिर सेक्टर ३४ चिचभवन या शाळेत निवड झाली. त्या विद्यार्थ्याचे पालक आवश्यक कागदपत्रे घेवून पडताळणी समितीकडे गेले. कागदपत्र सर्व बरोबर होते. पण समितीने डिस्टंस ॲपद्वारे घरापासून शाळेपर्यंतचे अंतर मोजले ते १ किलोमीटरपेक्षा जास्त आढळले. परंतु आरटीईच्या साईटमध्ये जेव्हा अर्ज केला तेव्हा तेच अंतर ८०२ मीटर दाखविले होते. आरटीईच्या साईटवरून अंतर मोजा असे पालकांचे म्हणणे होते. परंतु समिती डिस्टंस ॲपद्वारेच अंतर मोजण्यासाठी आग्रही होती. अंतर जास्त असल्याने समितीने त्या पालकांचा अर्ज बाजूला ठेवला. पालकांनी त्यांना प्रत्यक्ष भेट देवून अंतर मोजण्याची विनंतीही केली. परंतु समितीने ऐकुण घेतले नाही. चुकीच्या ॲपमुळे अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश अडचणीत आले आहे. आरटीईच्या साईटवर ऑनलाईन घेतलेले अंतर योग्य असतानाही खाजगी ॲप समिती वापरत आहे. अंतराची प्रत्यक्ष तपासणी करण्यासह कुणी तयार नाही. त्यामुळे मुलाचा प्रवेश अडचणीत आला असल्याची नाराजी पालकांनी व्यक्त केली.